परी वैष्णव न होसी अरे जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:03 PM2018-12-21T16:03:06+5:302018-12-21T16:03:15+5:30

जीवन जगत असतांना माणसाला सुख असावे असे वाटते पण सुख मिळत नाही. त्याचे प्रयत्न अनेक प्रकारचे असतात. भौतिक साधनाने सुख न

Fairy Vaishnava Na Hosi Hey Jana | परी वैष्णव न होसी अरे जना

परी वैष्णव न होसी अरे जना

Next

जीवन जगत असतांना माणसाला सुख असावे असे वाटते पण सुख मिळत नाही. त्याचे प्रयत्न अनेक प्रकारचे असतात. भौतिक साधनाने सुख न मिळता सुखाचा भास होतो. प्रपंचातील आजचे सुख उद्याचे दु:ख कधी होईल हे सांगता येत नाही. भौतिक साधनाने सुख नाही मिळाले कि मग मात्र माणूस अन्य मार्गाकडे वळतो. देव, देवलासी, बाबा, संत, साधू अशा अनेक प्रकारे तो उपाय करीत असतो पण ! धन हरे, धोका न हरे। अशी स्थिती होते. एके ठिकाणी म्हटले आहे. ‘चंदन थे तो घिस गये, रहे गये निमके खोड । सच्चे साधू चले गये रहें गये चपाती चोर ’ त्यामुळे खरे साधू संत ओळखू येणे अवघड आहे. कारण वरच्या वेषावर साधुत्व अवलंबून नाही. निळोबाराय म्हणतात ‘वर वेषा आम्ही पाहावे ते काय । अंतरीचे नोहे विद्यमान ।।’ वरच्या वेषावर काहीही अवलंबून नाही. संत मुक्ताबाई सुद्धा म्हणतात, वरी भगवा झाला नामे । अंतरी वश्य केला कामे ।।१।। ऐसा नसावा संन्याशी । जो का परमार्थाचा द्वेषी ।।२।। भगवा वेष धारण केला म्हणजे तो संन्याशी असेलच असे नाही. कदाचित तो दांभिक असू शकेल. म्हणून खरा साधू, संत कोणाला म्हणावे हे कळलेच पाहिजे. संत कबीरांचे म्हणणे असे आहे कि, पाणी पिना छानके, गुरु करना जानके।। आपण पाणी प्यायचे असेल तर ते स्वच्छ करून मगच पितो. तसेच जर गुरु करायचा असेल तर सर्व लक्षणे पाहूनच करावा. उगीच त्याची विद्वता, कपडे, बाह्य वैभव पाहून त्याला भुलू नाही. संत, वैष्णव हे एकार्थवाची शब्द आहेत. तापत्रयें तापला गुरुते गिवसिती । भगवा देखोनि म्हणती तारा स्वामी । मग ते नेणोनि उपदेशाच्या रीती । आनेआन उपदेशिती ।।१।।ज्ञानेश्वर माउली ।। त्रिविध तापाने जीव पोळलेला असतो मग त्याला वाटते कोणी तरी साधू भेटला कि त्याला गुरु करावे आणि मग भगवे कपडे घातलेल्या एखाद्या भोंदू साधूची भेट होते व त्यालाच गुरु करतात पण ! तो साधू नसून नुसता वेषधारी असतो. तो या चेल्याची चांगली फसगत करतो आणि हे सर्व त्या शिष्याच्या उशीरा लक्षात येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
परमार्थ करीत असूनही साधुत्व अंगी येईलच म्हणून सांगता येत नाही. वैष्णव म्हणविणे सोपे आहे पण प्रत्यक्षात वैष्णव होणे अवघड आहे. वैष्णव तो जया । अवघी देवावर माया ।।१।। नाही आणिक प्रमाण । तन धन तृण जन ।।२।।तू.म. ।। त्यालाच वैष्णव म्हणतात. ज्याचे सर्वस्वी प्रेम फक्त देवावर असते. त्याच्या चित्तात इतर कोणालाही जागा नसते. कारण प्रेम हे सर्वात उच्च प्रतीचे भक्तीचे लक्षण आहे. या भक्तीच्या आड तन, धन, जन काहीही येत नाही किंबहुना तो अत्यंत निस्पृह झालेला असतो. पातिव्रतेच्या प्रेमाचा विषय एकच असतो तो म्हणजे तिचा पती, पतीशिवाय ती आणिकाची स्तुती करू शकत नाही. कदाचित दुस-या पुरुषाची स्तुती झालीच तर तो व्यभिचार ठरतो. आणिकाची स्तुती आम्हा ब्रह्म्हांत्या ।। तसेच परमार्थात सुद्धा असते. भक्ती एक एकनिष्ठ असावी लागते. गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास असे चालत नाही पण ! बहुतेक सर्व ठिकाणी असेच दिसते. परमार्थ न करणा-यांची गोष्ट एक वेळ विचारात नाही घेतली तरी चालेल. पण जे भक्ती करतात ते सर्व वैष्णवच असतील असे नाही. श्री संत नामदेव महाराजांनी वैष्णव कोणाला म्हणावे हे एका अभंगात फारच सुंदर सांगितले आहे. वेदाध्ययन करिसी तरी वेदीकच होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।।१।।पुराण सांगसी तरी पुराणिकाची होसी। परी वैष्णव न होसी अरे जना।।२।।गायन करिसी तरी गुणिजन होसी ।परी वैष्णव न होसी अरे जना।।३।। कर्म अचरसी तरी कर्मठची होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।४।।यज्ञ करिसी तरी याज्ञिकाची होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।।५।।तीर्थ करिसी तरी कापडीच होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।।६।।नामा म्हणे केशवाचे घेसी।तरीच वैष्णव होसी जना।।७।।
वेदाध्ययन केले व चांगला वैदिक जरी झाला तरी तू वैष्णव होईलच असे नाही. पुराण चांगले रंगवून जरी सांगता आले तरी तू पुराणिक होसील पण वैष्णव नाही होणार. चांगले गाता आले, भक्ती गीत गायन केले म्हणजे तो भक्त थोडाच असतो तो फार तर फार कलाकार, गायक, गुणी असतो पण तो वैष्णव नसतो. व्यवस्थित यथासांग कर्म करता आले म्हणजे तो कर्मठ असतो तो वैष्णव होईलच असे नाही. यज्ञ याग व्यवस्थित करता आले म्हणजे तो चांगला याज्ञीक होईल पण वैष्णव होणे अवघड आहे. तीर्थ यात्रा करण्याचे जमले म्हणजे परमार्थ करता आला असे म्हणता येत नाही तो तीर्थयात्रा करणारा कापडी, संयोजक होईल पण खरा वैष्णव होणार नाही. भगवतांचे नाम मोठ्या प्रेमाने एकनिष्ठने घेतले म्हणजे मगच तो नामधारी वैष्णव होतो.
जो वैष्णव असतो त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रकारचे वाद असतात उदा. सृष्टी-दृष्टी वाद, दृष्टी- सृष्टी वाद, अजात वाद, विवर्त वाद, अनध्यस्त विवर्त वाद, त्यापैकीच दृष्टी-सृष्टी वाद आहे. याचा अर्थ असा आहे, दृष्टिकाली सृष्टी आपण व्यवहारात एखादा चांगला मनुष्य नसला कि आपण त्याला म्हणतो ह्या माणसाची दृष्टी चांगली नाही, सुर्ष्टी जसी आहे तशी आहे आहे पण दृष्टी चांगली नाही, याप्रमाणेच जो वैष्णव असतो त्याच्या दृष्टीने जगत हे जगत नसून ते परमात्म्याचेच रूप असतो भगवंतच या विश्वाच्या रूपाने नटलेला असतो. ‘जग असकी वास्तूप्रभा ।। असे अनुभवामृतामध्ये माउलींनी म्हटले आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।१।। आइकजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ।।२।। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।३।।.. हा सुंदर विचार जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी मांडला आहे तो अगदी यथार्थ आहे. म्हणून वरवरच्या लक्षणावर कधीहि भुलू नये. संतांनी सांगितलेले लक्षण विचारात घेऊनच संत, साधू , वैष्णव यांना शरण जावे म्हणजे आपली फसगत होणार नाही.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी (पाटील) ता. नगर
मोबाईल ९४२२२२०६०३

Web Title: Fairy Vaishnava Na Hosi Hey Jana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.