विचारांचा उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 02:02 AM2019-10-12T02:02:34+5:302019-10-12T02:02:43+5:30
खरेच असे उपवास करून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का?
- नीता ब्रह्मकुमारी
मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आधुनिक युगात प्रगती करणारा मानव अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण स्वत: मोठे होण्याची इच्छा बाळगतो, या इच्छांचा कुठेही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म घेते. कधी कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्यात या अट्टाहासापोटी आपण उपवास करीत राहतो. कधी सोळा सोमवार, कधी अकरा मंगळवार तर कधी आणि काही.
खरेच असे उपवास करून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा? हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी परंपरागत चालत आल्या त्याचा आपण अंगीकार केला. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्य पदार्थ तसेच पेय यांचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशीन आहे त्यालासुद्धा विश्रांतीची गरज आहे. जशी पिठाची गिरण आठवड्यातून एक दिवस बंद ठेवली जाते त्याप्रमाणे आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून शरीररूपी मशीनचं आॅइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल.
मनोविज्ञानात सांगितले जाते की जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले तर ती गोष्ट वृद्धीस पावते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. थोेडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली तर हे प्रकर्षाने जाणून येते की हे मन काही क्षणांसाठीसुद्धा स्थिर राहत नाही. मनाच्या एकाग्रतेची कमी असल्याचे दिसून येते. मनात सतत विचारांचे वारे वाहत असतात. पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीर तसेच जीवनावरही होतो. तुम्ही स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी, समाधानी बनवू इच्छित असाल तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.