वैराग्याचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:51 PM2019-01-12T12:51:07+5:302019-01-12T12:52:09+5:30

परमार्थाची पहिली पायरी म्हणजे ‘वैराग्य’.

Fate of favors | वैराग्याचे भाग्य

वैराग्याचे भाग्य

Next

अहमदनगर : परमार्थाची पहिली पायरी म्हणजे ‘वैराग्य’. तुम्हाला कितीही ज्ञान असले आणि त्याच्या जोडीला जर वैराग्य नसेल तर ते ज्ञान टिकू शकत नाही. अध्यात्माला विषयासक्तीचे वावडे आहे. विरक्तीवांचूनि काही । ज्ञानाशी तगणेची नाही । हे विचारूनि ठायी । ठेविले देवे ।। ज्ञान ।। विरक्ती जर नसेल तर ज्ञान टिकत नाही. कारण मनाचा स्वभाव असा आहे कि हे मन एका वेळेस एकाच विषयाला विषय करीत असते. दोन विषयाला ते विषय करू शकत नाही कारण मनाची वृत्ती अंत:कारणांतून जेव्हा बाहेर जाते तेव्हा ती एकाच विषयाकडे जाऊन त्या विषयाचे ज्ञान करून देत असते. विषय तर पाच आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच विषयाकडे मन सारखे धाव घेत असते, कारण त्याला या विषयात सुख आहे असे वाटत असते. खरे तर तेथे फक्त सुखाचा आभास असतो. ते सुख नाशिवंत असते पण! हे मनुष्याला लवकर कळत नाही जसे हरीण मृगजळाला पाणी समजून धावत सुटते आणि पाण्याची प्राप्ती न होता ते थकून जाते. त्याप्रमाणे या पंच विषयामध्ये जीव थकून जातो. पण समाधान मिळत नाही. म्हणूनच वैराग्याची अत्यंत आवश्यकता असते.
वैराग्य म्हणजे तरी नेमके काय आहे? भगवे कपडे करून घरदार सोडून वनात जावे कि डोंगरांत जाऊन गुहेत बसावे? वैराग्य वेगळे आणि वैताग वेगळा. घरी भांडण झाले म्हणून वैतागून कुठे तरी बाहेर निघून जाणे म्हणजे वैराग्य नव्हे. ते वैराग्य नसते तो वैताग असतो. संत मुक्ताईने म्हटले आहे कि, वरी भगवा झाला नामे । अंतरी वश्य केला कामे ।। ऐसा नसावा संन्यासी । जो का परमाथार्चा द्वेषी ।। किती तरी साधू असे असतात कि त्यांना ज्ञान, वैराग्य नसते फक्त काही तरी मनात विषय वासना धरून भगवा वेष केलेला असतो आणि लोकांची फसवणूक केलेली असते हा पोट भरू संन्यास काही कामाचा नसतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, भगवें तरी श्वान सहज वेश त्याचा । तेथे अनुभवाचा काय पंथ । लोकांना दिसायला वैराग्य आहे पण आतून मात्र विषयासक्ती गेलेली नसते ते फक्त सोंग असते. महाराजांचे वैराग्य फार कडक होते त्यांचे म्हणणे असे आहे कि, विवेकासह वैराग्याचे बळ । धगधगीत अग्नी ज्वाळ जैसा ।। वैराग्याच्या जोडीला विवेक असावा लागतो विवेक जर नसेल तर ते वैराग्य कुठे तरी भरकटते. माउली म्हणतात, विवेकवाचुनी वैराग्य आंधळे । वैराग्यावाचूनि विवेक पांगळे । जेवी धृतराष्ट्रा जेष्ठत्व आले । परी नेत्राविण गेले राज्य पै ।। असा प्रकार आहे म्हणून विवेक आणि वैराग्य हे दोन्ही आवश्यकच आहे. वैराग्याची व्याख्या, ‘इहलोकापासून ते ब्रह्मलोकांपर्यंत अनुकूल मानलेल्या विषयाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. विषय अनुकूल असावा आणि तो भोगण्याची शक्ती असावी व भोक्त्याने तो विषय नाकारावा याचेच नाव वैराग्य. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांकडे देहूतील काही विघ्नसंतोषी लोकांनी एक गणिका पाठविली तिला पाहून महाराज तिला म्हणाले, पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे झाले ।। त्या वेश्येला महाराजांनी आई म्हणून हाक मारली. त्यामुळे त्या स्त्रीला सुद्धा वैराग्य उत्पन्न झाले आणि ती पारमार्थिक बनली, तिचे हे खरे परिवर्तन झाले हे ख-या अर्थाने अध्यात्म होय.
स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये जागतिक धर्मपरिषदेसाठी गेले होते तेव्हा त्याच्या एका वाक्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदर उत्पन्न झाला. ते वाक्य म्हणजे ‘बंधुनो आणि भगिनींनो देव एक आहे. ज्या लोकांना स्त्री पुरुष एवढाच भाव माहित होता त्यांना बंधू भगिनी हा भाव स्वामीजींनी माहित करून दिला त्यांची प्रसिद्धी वाढली परिणामत: तेथील एक इंग्रज स्त्री त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाली, ‘स्वामीजी मला तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे कारण, आपला जर विवाह झाला तर आपल्याला तुमच्यासारखा बुद्धिमान आणि माझ्यासारखा सुंदर मुलगा होईल. स्वामीजींनी तात्काळ त्या स्त्रीपुढे गुडघे टेकवले आणि सांगितले कि, आई ! मीच तुझा मुलगा आहे, त्यासाठी विवाह करण्याची आवश्यकता नाही. हे खरे वैराग्य आणि असे वैराग्य ज्यांना आहे तेच महात्मे, विचारवंत या जगात क्रांती घडवू शकतात.
दोष दर्शन, मिथ्यत्व दर्शन आणि ब्रह्म दर्शन असा हा क्रम आहे. वैराग्य होण्याकरिता विषयातील दोष कळले पाहिजेत. म्हणजे आपोआप त्याग होतो. एखाद्या वस्तूतील दोष न कळता त्यातील दोषच गुणत्वाने कळू लागला तर त्याचा त्याग होत नाही. माउलींनी एका ओवीत फार छान सांगितले आहे, विषे रांधिली रससोय । जै जेवणारा ठाऊवी होय । तै तो ताटची साडूंनी जाय । जयापारी ।। तैसे संसारा या समस्ता । जाणिजे जय अनित्यता । तै वैराग्य दवडिता । पाठी लागे ।। ज्ञान. एखादा मनुष्य पंगतीला जेवायला बसला आणि ताटामध्ये सुंदर पदार्थ वाढलेले आहेत. त्यात छानपैकी बासुंदी आहे व ती बासुंदी ह्याला आवडते सुद्धा त्याला असे वाटते कि कधी एकदा मी हि बासुंदी पितो ? [पण ! तेवढ्यात त्याचा तेथीलच एक मित्र धावत त्याच्याकडे आला आणि म्हणाला, अरे ! तुझ्या ताटात जी बासुंदी आहे ना त्या वाटीमध्ये जहाल असे विष टाकलेले आहे, या लोकांचा तुला मारण्याचा डाव आहे. मित्रांनो ! समोर बासुंदी दिसते आणि त्याला आवडते सुद्धा पण आता ती बासुंदी खाण्याची त्याची बिलकुल इच्छा नाही. अगदी कोणी आग्रह केला तरी तो आग्रहाला बळी पडणार नाही. किंबहुना तो त्या ताटावरून तात्काळ उठून निघून जाईन. तुकाराम महाराज म्हणतात, विटले हे चित्त प्रपंचापासोनि । वमन ते मणी बैसलेंसे ।। किंवा वमिलिया अन्ना । लाळ न घोटी रसना ।। कितीही सुंदर पदाथार्ची 'वांती ' असू द्या कोणीही ती वांती खाण्याची इच्छा करणार नाही. त्याप्रमाणे या जगतातील दोष माहित झाल्यामुळे साधू संतांना या जगाचे आकर्षण राहिलेले नसते. याचेच नाव वैराग्य. म्हणून दोष दृष्टी वैराग्य निर्माण करते आणि मिथ्यत्व दृष्टी अंतर्मुख वृत्ती करते व नंतर सर्वत्र परमात्माच आहे हे कळते व र्ब्हमदृष्टी होते.
वैराग्य अत्यंत महत्वाचे आहे, ते हे विषय वैराग्य । आत्मलाभचे भाग्य । येणे ब्रह्मानंदा योग्य । होती जीव ।। ज्ञा. ।। या वैराग्यामुळेच जीव हा ब्रहमरूप होतो म्हणूनच साधनांशात या साधनांची अत्यंत गरज आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांसारखे वैराग्य कोणाचे नाही. छत्रपती शिवरायांनी त्यांना पालखीचा मान व द्रव्य पाठविले होते पण महाराजननी नम्रपणे ते सर्व वैभव नाकारले. दिवट्या छत्री घोडे। हे तो ब-यात न पडे॥१।। आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥२।। मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव॥३।। गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा॥४।। सोने आणि माती।आम्हा समान हे चित्ती॥५।। तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥६।।' किंवा काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलची व्हावा ।।१।। तुम्ही कळलेती उदार । साटी परिसाची गार ।। येर तुमचे वित्त धन । ते मज गोमांसासमान ।।' हे फक्त जगद्गुरू श्री तुकाराम महाराजच म्हणू शकतात. त्यांनी एका अभंगामध्ये वैराग्याचे फार छान वर्णन केले आहे,' वैराग्याचे भाग्य । संतसंग हाचि लाभ ।।१।।संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ।।२।। तोचि देवभक्त । भेदाभेद नाही ज्यात ।।३।। तुका नाचे गाये । गाणियात विरोनी जाये ।।४।। वैराग्य होणे हे एक फार मोठे भाग्य आहे त्यामुळे संतसंग मिळतो किंबहुना संतसंग नाही मिळाला तर ते खरे वैराग्य नाही. संतकृपेचा हा मोठा दीपस्तंभ आहे तो साधकाला निष्पाप करतो असा जो वैराग्यवान संत आहे. त्याजवळ कोणताही भेदाभेद नसतो तुकाराम म्हणतात. मी गाणे (भजन ) गातो आणि त्याच भगवंताच्या गाण्यात विरून जातो म्हणजे तल्लीन होतो. परमाथार्ची हि अतिउच्च अवस्था होय.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पाटील) ता. नगर.
मोबाईल ९४२२२२०६०३

Web Title: Fate of favors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.