‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 03:50 AM2018-10-09T03:50:54+5:302018-10-09T03:51:20+5:30
‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान.
- प्रल्हाद वामनराव पै
‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान. का दिलं पाहिजे? निसर्गाचा क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आहे. ‘सुख देणं’ ही सूक्ष्म क्रिया आहे. तिची प्रतिक्रिया सहस्रपटीने मिळणार. तुम्ही म्हणाल, आम्हीच पहिलं का द्यायचं? आपण जेव्हा सुख आपल्याकडे अनुभवतो तेव्हा फक्त तुम्हीच सुखी होता. पण जेव्हा सुख दुस-यांना देता तेव्हा तुम्ही, कुटुंब, समाज, राष्ट्र सुखी होतं. कुणाला द्यायचं? आपल्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आॅफिसमधील सहकारी, शेजारी, इ. द्यायचं. कसं द्यायचं ? आपण वीज कशी देतो, वायरमधून देतो. तसं शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ वागणं, शुभकर्मातून आपण सर्व काही देऊ शकतो. काय द्यायचं? असा विचार येताच आपल्याला वाटतं की धनदान करायचं. आपण काय काय देऊ शकतो पाहूया. जे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लोकांना द्या. तुम्हाला यश पाहिजे तुम्ही दुसºयांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. प्रेम पाहिजे प्रेम द्या. आनंद पाहिजे आनंद द्या. मान (सन्मान) पाहिजे मान (सन्मान) द्या. कौतुक पाहिजे दुसºयाचं कौतुक करा. तुमचं कोणी ऐकावं असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही दुसºयाचं ऐका. का द्यायचं? कारण तुम्हाला गरज आहे. तुम्हाला सुख, आनंद, सन्मान, कौतुक पाहिजे म्हणून द्या. किती द्यायचं? देण्याची वृत्ती काही लोकांकडे खूप असते. परंतु तुमच्या कुवतीप्रमाणे द्या. आहे ते सर्व देऊ नका. शहाणपणाचा वापर करा. सत्पात्री दान पाहिजे. पण द्यायला शिका. थोडं द्या. आणखी येईल. अजून द्या. अजून येईल. माझ्याकडे मुबलक आहे हा भाव पाहिजे. ऐश्वर्याचा, समृद्धीचा, विपुलतेचा भाव पाहिजे. ‘देताना’ कृतज्ञतेचा भाव पाहिजे. ‘आहे’ हा भाव पाहिजे. अंतर्मनाला भावना भावतात. त्याला असा भाव भावतो. दिल्याने कोणतीच गोष्ट कमी होत नाही. दिल्याने तुमची श्रीमंती आतून आणि बाहेरून वाढते. आतून वाढते म्हणजे मन व्यापक होते. म्हणजे मनाची श्रीमंती वाढते. आणि बाहेरून घरची श्रीमंती वाढते. आपण एका बाजूने हवा बाहेर काढली तर दुुसºया बाजूने ती अधिक दाबाने आत येते. तसं तुम्ही एका बाजूने जेवढे द्याल तेवढे दुुसºया बाजूने येण्याची व्यवस्था होईल. खरं तर देण्याची इच्छा जरी केली तरी येण्याची व्यवस्था होते. म्हणून ‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे.’