पवित्र अन् उत्सवी श्रावण...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 04:04 PM2019-08-14T16:04:07+5:302019-08-14T16:04:19+5:30
आध्यात्मिक
उत्सवप्रिय सोलापूरकरांकडून श्रावण महिन्यात भक्तिरसाचा जागर होतो. या पवित्र महिन्यात विविध उत्सवांना उधाण येते. मनातला भक्तिभाव उत्सवांच्या आयोजनाने सार्वजनिक होतो अन् शहरभर भक्तीच्या वातावरणाची निर्मिती होते. मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव, तोगटवीर समाजाचा ज्योती उत्सव, चिम्मटेश्वर, नीलकंठ, मडिवाळ माचदेव, नीलकंठेश्वर, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या आयोजनाने शहरातील सामाजिक वातावरण सलोख्याचे होते.
पूर्व भागातील तेलुगू भाषिकांचे कुलदैवत असलेल्या मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. नुुलूपुन्नम (नारळी पौर्णिमा) च्या दिवशी पद्मशाली समाजबांधव पहाटेपासूनच मार्कंडेय मंदिरात दर्शनासाठी रांग लावतात. परंपरागत यज्ञोपवित (जानवे) धारण करून धर्मरक्षणार्थ पुरोहितांकडून सुताची राखी बांधून घेतली जाते. त्यानंतर बहिणीकडून राखी बांधून घेतली जाते. त्यानंतर ते मार्कंडेय महामुनींच्या मिरवणुकीत सहभागी होतात. तोगटवीर क्षत्रिय समाजाची कुलदेवता श्री चौडेश्वरी देवीचा ज्योती उत्सव श्रावण पौर्णिमेच्या (राखी पौर्णिमा) मध्यरात्री साजरा केला जातो. या देवीचे मूळ स्थान नंदवरम् (आंध्रप्रदेश) येथे आहे. नंदवरम् येथे देवीचे प्राचीन विशाल मंदिर आहे.
तोगटवीर बांधव देवीच्या रूपातील ज्योतीस डोक्यावर घेऊन वीरश्रीपूर्ण आवाजात तलवारीचा खेळ करतात. तळहातावर निरांजने घेऊन आरती करत मंदिरात आणतात. या प्रथेनुसार सोलापुरात ज्योती उत्सव साजरा केला जातो. तोगटवीर बांधव सोलापुरात थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात (१७७५ ते १८००) आले. हातमागावरील वस्त्रे विणणे आणि विकणे हा व्यवसाय करत हे बांधव सोलापुरात स्थायिक झाले. सन १८३० पासून तोगटवीर बांधव सोलापुरात ज्योती उत्सव साजरा करू लागले. सन १८६० साली फंडीची निर्मिती झाल्यावर फंडीच्या वतीने ज्योती उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. फंडीची परंपरा अनोखी असून याचा सरावही काही दिवस आधीपासून करण्यात येतो.
मंगळवारी (दि़ १३ आॅगस्ट) स्वकुळ साळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या जिव्हेश्वर महाराजांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात काढण्यात आला. याच दिवशी गुरुवार पेठेतील कुरुहिनशेट्टी समाजाचे दैवत नीलकंठेश्वरांची रथात मिरवणूक काढण्यात आली. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नाभिक समाजाचे कुलदैवत असलेल्या चिम्मटेश्वरांचा रथोत्सव काढण्यात आला. शहरात आंध्र, तेलंगणातून आलेला तेलुगू नाभिक, कर्नाटकातून आलेले कन्नड भाषिक समाज, महाराष्ट्रातील मराठी भाषिक नाभिक समाज आहेत. वर्षभर आपल्या सेवेत मग्न असलेला हा सर्व नाभिक समाज या निमित्ताने सहकुटुंब एकत्र आलेला दिसून येतो.
बहुतांश तेलुगू भाषिक समाज राहत असलेल्या पूर्व भागातील कन्ना चौक ते अशोक चौक यादरम्यान चिम्मटेश्वरांचा रथोत्सव काढण्यात आला. याबरोबरच गोकुळाष्टमीचा उत्सव सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कष्टकरी समाज म्हणून ओळखल्या जाणाºया वडार समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह.भ.प. लक्ष्मण धोत्रे महाराज यांनी सुरू केलेला गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील मध्यवर्ती भागात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या दहीहंड्या फोडण्याचा मान वडार समाजाला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी समाजातील १०० तरुणांचा गोविंदा पथक एक महिना अगोदर तयारीला लागत असतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री १२ वाजता मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माचा कार्यक्रम झाल्यानंतर गुलालाचा कार्यक्रम होतो. दुसºया दिवशी बुधवारपेठ येथील सोलापूर वडार समाजाच्या वतीने शहरातून श्रीकृष्ण पालखी काढली जाते. पालखीत महिला डोक्यावर पोथी, पुराण घेऊन सहभागी होतात.
- महेश कुलकर्णी