सुमधुर भक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:45 AM2019-11-13T04:45:43+5:302019-11-13T04:45:55+5:30
माणसंं करू शकतात अशा अनेक अद्भुत गोष्टी जगात आहेत, पण दुर्दैवाने प्रत्येक जण अशा गोष्टींची निवड करतोच असे नाही.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
माणसंं करू शकतात अशा अनेक अद्भुत गोष्टी जगात आहेत, पण दुर्दैवाने प्रत्येक जण अशा गोष्टींची निवड करतोच असे नाही. ते प्रेम करू शकतात, आनंदी असू शकतात, आपापसात आनंद वाटून घेऊ शकतात, ते एकमेकांसाठी जगू शकतात आणि मरूही शकतात, एकमेकांची सेवा करू शकतात, ते अद्भुत संगीत आणि कलाकृती निर्माण करू शकतात. माणसं करू शकतात अशा सर्व अद्भुत गोष्टींपैकी, सगळ्यात सुमधुर गोष्ट एक व्यक्ती करू शकतो, ती म्हणजे या धर्तीवर चालता-फिरताना जरा भक्ती-भावाने वावरणे. जीवनात सर्वोच्च गोडवा म्हणून जर काही असेल जे मनुष्य आपल्यात अनुभवू शकतो तर नक्कीच तो आहे - भक्तीचा गोडवा. भक्तीयुक्त जीवन जगणे ही सगळ्यात हुशारीची व फलदायक कृती ठरेल. कारण आजपर्यंत कुठल्याच माणसाने आपल्या आयुष्यात भक्तीविना एकनिष्ठतेने जगात असं काहीच विलक्षण, कल्याणकारी निर्माण केलेले नाही. मग तो खेळ असो, कला, संगीत, नृत्य किंवा इतर कोणतंही कार्य असो; जगात जर परिणामकारक असं काहीतरी निर्माण करायची इच्छा असेल तर त्यात स्वत:ला भक्तीयुक्त एकनिष्ठतेने समर्पित केल्याखेरीज ते साध्य करणे शक्य नाही. आणि जी सार्थकता असा एकनिष्ठ भक्त अनुभवतो ती इतर कुणीच समजू शकत नाही आणि ती काही त्याच्या कार्याच्या परिणामावर अवलंबून नाही तर केवळ ते कार्य करण्याच्या आनंदात लाभते. कारण ती व्यक्ती तल्लीन होऊन भक्तिभावाने त्यात समर्पित असते. भक्तिभावाने जगात अनेक विधायक बाबी सहजगत्या साकार होऊ शकतात. मात्र ते लक्षात घेत तसंच आपल्या जीवनातील लक्ष्य हवं. तसंच भक्तिभावपूर्वक आचरण हवं. तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतं. भक्ती जीवनात आनंद निर्माण करते. त्याने प्रत्येक व्यक्ती समाधानी होत जातो. प्रत्येक कुटुंब आनंदी होऊ शकतं आणि संपूर्ण समाजही भक्ती आणि आनंदाने न्हाऊ शकतो. हाच नियम संपूर्ण जगाला लागू होत जातो.