इतिहासात प्रथमच ‘गुड फ्रायडे’ची उपासना घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 03:44 PM2020-04-10T15:44:11+5:302020-04-10T15:50:05+5:30

मात्र, इतिहासात प्रथमच शुक्रवारी, १० एप्रिल रोजी ही उपासना कोरोनामुळे घरात राहूनच करावी लागली.

For the first time in history, 'Good Friday' is worshiped at home | इतिहासात प्रथमच ‘गुड फ्रायडे’ची उपासना घरीच

इतिहासात प्रथमच ‘गुड फ्रायडे’ची उपासना घरीच

googlenewsNext

प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील बलिदान आजही मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे़ त्यांचे बलिदान जगभर ‘गुड फ्रायडे’ म्हणजेच सकारात्मक दिवस पाळला जातो. या दिवशी चर्चमध्ये येऊन सर्वजण उपासना करतात. मात्र, इतिहासात प्रथमच शुक्रवारी, १० एप्रिल रोजी ही उपासना कोरोनामुळे घरात राहूनच करावी लागली.

भारतासह जगभरात लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. हजारो लोक मृत्यमुखी पडले आहेत. कोलमडलेली अर्थव्यवस्था, हातावरचे पोट असणा-यांची उपासमार होत आहे. झपाट्याने वाढणारे रुग्ण, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य समाज भयभीत आहे. अनेक डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक सुखांचा त्याग करून निरंतर सेवा करीत आहेत. रुग्णांची सेवा करणा-या अनेक डॉक्टर व नर्सेसही कोरोनाचे बळी ठरले आहेत. अनेकांना त्यांच्यामध्येच आज देव जाणवत आहे. इतरांसाठी झटण्याची, त्याग करण्याची त्यांची प्रेरणास्त्रोत कदाचित विविध असतील. पण यानिमित्ताने दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे मानवजातीसाठी वधस्तंभावरील बलिदान आजही प्रेरणादायी आहे, असे जाणवते. आज, गुड फ्रायडे! कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी इतिसात प्रथमच सार्वजनिकरित्या ‘गुड फ्रायडे’ उपासना करण्यात आला नाही.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत येशूने दिलेली शिकवण आपल्याला प्रेरणादायक आहे. येशूचा समाजसेवेचा वारसा आज अनेक ख्रिस्ती संस्था पुढे घेवून जात आहे, मिशन-यांचे सामाजिक उत्थानासाठीचे कार्य अभिमानस्पद आहे. निस्वार्थी सामाजिक कामाची परंपरा कोरोनासारख्या विषाणूच्या महामारीतही या संस्था पुढे नेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही बूथ हॉस्पिटलने कोरोनाच्या रुग्णांची जबाबदारी स्वीकारली़ एकूण रुग्णांपैकी ०२ रुग्ण बरेही केले. भा. पा. हिवाळे संस्थेच्या सी.एस.आर.डी. समाजकार्य संस्थेने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या २०० हून मजुरांची उपासमार लक्षात घेवून त्यांना आसरा देत गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे. याकामी त्यांना बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व कासा सारख्या संस्थाची मदत मिळत आहे. जामखेडच्या आरोळे हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केलेल्या रुग्णांवर रवी आरोळे व शोभा आरोळे हे भाऊ, बहिण उपचार करीत आहेत. त्यांची काळजी घेत आहेत. आज अनेक चर्चेसमधून ख्रिस्ती बांधवामार्फत उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबाना रेशन व अन्नदान पुरविण्यात येत आहे. या संस्थाचे सद्यस्थितीतील कार्य येशूंच्या गौरवास्पद प्रेरणेचे द्योतकच आहे.
गुड फ्रायडेनिमित्ताने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी वधस्तंभावरील मरण स्वीकारलेल्या येशू ख्रिस्त नावाच्या योध्याच्या बलिदान दिनाचे स्मरण जीवनाविषयी सकारात्मकता निर्माण करेल. जगाच्या सर्व इतिहासातला अत्यंत भयानक, निष्ठूर असा तो दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणत्याही व्यक्तीचे दु:ख इतके क्लेशदायक नसेल. कोणत्याही मानवाला इतके अन्यायी रीतीने वागवले गेले नाही; दोन हजार वर्षांपूर्वी येरुशलेमच्या बाहेर असलेल्या टेकडीवर जी  भयाण  घटना घडली, तिच्याशी कशाचीही बरोबरी होणे शक्य नाही. कोणताही गुन्हा न करता येशूला थेट वधस्तंभावरील मरणाची शिक्षा ठोठावली गेली. येशू हे सगळे थाबवू शकला असता़ आपल्या अनुयायांना सोबत घेवून युद्ध पुकारू शकला असता. पण त्याने मानवजातीच्या कल्याणासाठी ते दु:ख स्वीकारले होते. येशूच्या शरीरावर अनेक फटके मारले गेले. त्याला काट्याचा मुकूट घातला गेला. वाईटातील वाईट गोष्ट घडूनही त्या दिवसाला ‘उत्तम शुक्रवार’ म्हणतात. यापेक्षा सकारात्मकता काय असू शकते? येशूने प्रीती ही सर्वश्रेष्ठ मानली. शत्रूवरही प्रेम करण्याचे शिकवले. वाईटाने जिंकला जावू नकोस तर ब-याने वाईटाला जिंकावे ही शिकवण आजही तंतोतंत लागू होते.
वधस्तंभावरील यातना सहन करत असताना येशूच्या मुखातून सात उद्गार निघाले होते. त्यांना सात शब्द असेही म्हणण्यात येते. ते खाली ज्या क्रमाने दिले आहेत़ त्या क्रमाने तो ते बोलला असावा असा तर्क केला जातो:
१) बापा, त्यांना क्षमा कऱ कारण ते काय करतात, हे ते जाणत नाहीत. (लूक २३:३४)
२) तुला सत्य सांगतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. (लूक २३:४३)
३) बाई, बघ तुझा पुत्र!, बघ, तुझी आई! (योहान १९:२६-२७)
४) माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? (मत्तय २७:४६, मार्क १५:३४)
५) मला तहान लागली आहे. (योहान १९:२८)
६) पूर्ण झाले. (योहान १९:३०)
७) बापा, मी तुझ्या हाती माझा आत्मा सोपवतो. (लूक २३:४६)

प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण सोसत असताना उच्चारलेले हे शब्द जगण्याकडे अनेक अर्थाने जगण्याचा सार शिकवून जातात. या सात शब्दाचे विवेचन पुढील प्रमाणे करता येईल- 
पहिला शब्द - क्षमेचा उद्गार : हे बाप्पा, त्यांना क्षमा कऱ कारण ते काय करत आहेत, ते त्यास समजत नाही.
येशू वधस्तंभावर खिळलेला आहे आणि तो वेदना सहन करीत होता. अशाही परिस्थितीत तो मानवाचा विचार करीत होता. ज्या लोकांनी त्यांचा छळ केला, त्याच लोकांसाठी येशूने वधस्तंभावरून क्षमेसाठी देवपित्याला मध्यस्थीची प्रार्थना केली. हे बाप्पा, त्यांना क्षमा कऱ कारण ते काय करत आहेत, ते त्यास समजत नाही. लूक : 23:34 (बायबल) या शब्दात शांतपणा आहे. कुठलाही राग, सुडाची भावना, द्वेष जाणवत नाही़ परंतु आज आपण आरे ला कारे करायला लगेच तत्पर असतो. क्षमेची भावना आपल्यातून नाहीशी होत आहे.  क्षमेपुढे बाकीच्या देणग्या व कृपादाने फिक्कीच आहेत. 
दुसरा शब्द : वधस्तंभावर दु:ख भोगीत असताना येशू त्याच्या बरोबर असलेल्या चोराला म्हणाला, ‘मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकांत असशील. लूक 23:43 (बायबल) प्रभू येशू सोबत दोन चोरानाही वधस्तंभावरील मरणाची शिक्षा देण्यात आली होती. एका चोराने कुचेष्टा करून येशूला म्हटले की, तू जर खरंच देवाचा पुत्र असशील तर स्वत:सह आम्हालाही वाचव, तर दुस-या चोराने आपल्या पापाची कबुली देत क्षमा मागत स्वर्गात आठवण ठेवण्याची विनंती केली. यावर येशूने तत्काळ त्याला तू आज मजबरोबर सुखलोकांत असशील हे वचन दिले. यावरून येशूच्या करुणेची व क्षमाशील अंत:करणाची प्रचिती येते. आपणही आपल्या चुकांबद्दल पश्चाताप केला पाहिजे. 
तिसरा शब्द - ममतेचा उद्गार : येशू आपल्या आईची काळजी घेतो. तो शिष्याला म्हणतो, ‘पाहा ही तुझी आई! आणि आईला म्हणतो, ‘बाई पाहा हा तुझा मुलगा!’ येशू वधस्तंभावरील दुख: भोगत असतांना येशूची आई मारिया त्याच ठिकाणी होती. आपल्या मुलाचे होणारे हाल तिला पहावत नव्हते. जगाच्या कल्याणाचा विचार करणारा येशू मात्र आपल्या आईकडे पाहून कासावीस झाला. आपल्यानंतर आपल्या आईचे काय होईल, याची चिंता त्यास होती. त्यामुळे मरण येतानेही त्याने आपल्या आईची काळजी घेत तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या शिष्यास दिली. प्रत्येक लेकरांनी आई-वडिलांची काळजी घ्यावी. त्यांचा सांभाळ करावा ही येशूची शिकवण त्याने स्वत:च्या आचारणात आणली.
चौथा शब्द : दु:खाचा उद्गार : येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला ‘एलोई एलोई, लमा सबक्तनी’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?’ मार्क 15:34 (बायबल)़ ही येशूची अरॅमिक भाषा आहे. पाप लादलेला येशू आता अतुच्य टोक गाठलेल्या दु:खामध्ये होता. आम्हा सर्वांचे पाप येशूवर स्वत:वर लादले. यावेळी देवपित्याने त्याच्यापासून तोंड फिरवले आणि हेच दु:ख येशूला झाले. पित्याचा विरह, आम्ही पापातच राहिलो. दैवत्व असूनही मानवी मनाची होणारी घालमेल यामधून प्रवर्तीत होते. 
पाचवा शब्द : क्लेशाचा उद्गार : येशूने ‘मला तहान लागली आहे’ असे म्हटले. (योहान 19:28). जग, पाणी ज्याने निर्माण केले, जो म्हणाला मी जीवनाचे पाणी आहे. तोच आता म्हणतो, ह्यमला तहान लागली आहे. येशूला लोकांनी चांगले व खरेपणाने वागावे, इतरांवर अत्याचार करू नये, न्यायाने वागावे याची तहान येशूला लागलेली होती. ती आम्ही कधी शमवणार? आम्हीही खरेपणाने व न्यायाने वागून त्याची तहान शमविली पाहिजे. 
सहावा शब्द - विजयाचा उद्गार : येशूने ‘पूर्ण झाले आहे’, असे म्हटले. (योहा. 19:30 बायबल), कार्याच्या पूर्णतेची ग्वाही! कार्य सिद्धीस नेल्याने सुटकेचा, समाधानाचा, विजयाचा शब्द उच्चारला! येशूने देवाने दिलेली मानवजातीच्या कल्याणाची कामगिरी पूर्ण केली. त्याला दिलेली जबाबदारी त्याने आपल्या बलिदान देवून पूर्ण केले. एकप्रकारे आपल्या कामाचा अंतिम अहवाल त्याने देवाला सादर केला. ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कायार्चा परिणाम पूर्णपणे समजावून घेण्यासाठी आपणही आपापले कार्य जबाबदारीने पूर्ण करण्याचा संकल्प केला पाहिजे. कोणतेही काम चुकीच्या पद्धतीने न करता अधिका-यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून केले पाहिजे. 
सातवा शब्द - समाधानाचा उद्गार : तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, ‘हे बाप्पा, मी आपला आत्मा  तुझ्या हाती सोपवून देतो.’ असे बोलून त्याने प्राण सोडला. (लूक 23:24 बायबल) आत्मा पित्याच्या हाती दिला. आत्मा फारच मौल्यवान आहे. ही ठेव आहे. आपले कर्म आत्मा नरकात जाईल की स्वर्गात हे ठरवतात त्याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. नेहमी चांगले वागून पाप न करता आत्म्याचा नाश होऊ नये, याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. आत्म्याचा नाश होऊ नये, यासाठी आपल्या वर्तणुकीकडे सतत लक्ष दिले पाहिजे. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि वाईट गोष्टी करून आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आपण मारताना जगातील कोणतीच संपत्ती सोबत घेवून जात नाही़ सोबत जाते ते फक्त आपले कर्म. 
येशू सदैव इतरांसाठी जगला आणि मरणही इतरांसाठी स्वीकारले. लॉकडाऊनच्या काळात आपल्या कर्माबाबत चिंतन केले पाहिजे. कोरोनाचे संकट लवकरच जाईल़ या संकटात लढणा-या सर्वांना प्रेरणा देण्यासाठीच घरात राहून प्रशासनास सहकार्य करत सामुदायिक प्रार्थना टाळली आहे. घरात राहूनच सर्वांनी उपासना केली.

- रेव्ह. जे. आर. वाघमारे 
प्रिष्ट इन चार्ज, सेंट झेव्हियर कॅथेड्रल चर्च, सी.एन.आय. तारकपूर, अहमदनगर 
९३७२४६४२८६

Web Title: For the first time in history, 'Good Friday' is worshiped at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.