। आनंदाचा पूर ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:36 AM2018-07-21T00:36:29+5:302018-07-21T00:36:40+5:30

‘पुण्य फळले बहुत दिवसा। भाग्य उदयाचा ठसा।।’ असं बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला या वारीचा अनुभव घेता आला.

. Flood of joy | । आनंदाचा पूर ।

। आनंदाचा पूर ।

Next

-इंद्रजित देशमुख-

‘पुण्य फळले बहुत दिवसा।
भाग्य उदयाचा ठसा।।’
असं बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला या वारीचा अनुभव घेता आला. त्यातही या भाग्याची पूर्णावस्था आज अनुभवायला मिळणार आहे, कारण आज आमची ज्ञानेश्वर माउली भंडीशेगावहूुन निघून, तर आमचे तुकोबाराय पिराच्या कुरोलीतून निघून वाखरीत पोहोचणार आहेत. या दोन्ही आणि इतरही कितीतरी संतांच्या पालख्या वाखरीत येणार आहेत. समुद्राला मिळण्याअगोदर गंगेने जे विस्तीर्ण रूप धारण केलंय नेमकं तसचं पंढरपुरात पोहोचण्याअगोदर हा वैष्णवांचा महापूर वखरीत विसावणार आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या
‘जन्मोजन्मीचे संचित।
भेटी झाली अकस्मात ।।’
या वचनाप्रमाणे डोळ्यांचेच काय, सबंध देहाचे पारणे फेडणारे क्षण आम्ही आज अनुभवणार आहोत.
आजच्या या सोहळ्यात आनंदाचा अक्षरश: पूर आलाय. पंढरपूर अगदी जवळ आलंय. ज्याच्या भेटीसाठी इतके दिवस चालत चालत कितीतरी वेळा पदरी आलेल्या अव्यवस्थेला व्यवस्था समजून जे चालणं झालं. प्रत्येक क्षणाला ज्याचा आठव या बुद्धीला स्पर्श करायचा आणि भेटीची हुरहूर नव्या उत्तेजनेने चाळवून जायचा. ज्याच्या भेटीच्या आसेने मन व्याकूळ झालंय, तो आमचा पांडुरंग परमात्मा आता आम्हाला भेटणार यामुळे हर्ष आणि उल्हास यांचा मिलाफ आमच्या अंगोअंगी उसळतोय. आजच्या क्षणाचं वर्णन करताना आमचे तुकोबाराय म्हणतात,
‘पूर आला आनंदाचा।
लाटा उसळती प्रेमाच्या।।
बांधू विठ्ठल संगडी।
पोहून जाऊ पैलथडी।।
अवघेजण गडी।
घाला उडी भाईनो।।
हे तो नाही सर्वकाळ।
अमूप आनंदाचे जळ।।
तुका म्हणे थोरा पुण्ये।
ओघ आला पंथे येणे।।’
महाराज इथे आनंदाचा पूर आलाय म्हणतात. वास्तविक, सामान्य जगणं जगताना आमच्या अवतीभोवती निव्वळ आणि निव्वळ दु:खच किंवा निराशाच असते. अपेक्षा सुखाची किंवा आनंदाची असते आणि प्राप्ती मात्र दु:खाचीच असते. अगदी महाराजांच्याच भाषेत सांगायच झालं तर,
‘संसार दु:खमूळ चहुकडे इंगळ।
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।।’
असं जगावं लागतं; पण इथं मात्र अंत:करणात आंनदाचं भरत आलेले तुकोबाराय आनंदाच्या पुराचं वर्णन करतात. आनंदाचा पूर आलेला आणि त्यावर उसळणाऱ्या प्रेमाच्या लाटा, म्हणजेच वारीत आंनद आहे. अगदी आंनदाचा पूर आहे; पण त्यातही प्रेमाचं आधिस्थान आहे कारण आमच्या जीवनात बºयाचदा आंनद निर्माण झाला की, त्या आंनदासोबत मद निर्माण होतो आणि त्यातूनच परत अपपरभाव किंवा परतिरस्कार भाव वाढतो. थोडक्यात काय, या सगळ्यातून संकुचितताच वाढीस लागते; पण इथे वारीत आलेला आनंदाचा पूर त्यावर उसळणाºया प्रेमाच्या लाटा हे सगळं सहजीवी आणि परसुखसंतोषी भावातून निर्माण होणार आहे म्हणूनच महाराज सगळ्यांना सांगतात की, ‘विठ्ठल नामाची सांगड बांधूया आणि सगळेचजण हा भवसागर तरुन जाऊया. याचसाठी सगळेजण या आनंदात उडी घ्या. वेगळे राहू नका. वरचेवर असा अमूप आंनद सोहळा आपल्याला अनुभवता येणार नाही. कदाचित आपली पुण्याईच थोर जेणेकरून हा आंनदपुराचा ओघ आपल्या वाटेत आलाय. या, यात न्हाऊया, मंगल बनूया.’
आज दुपारी ज्यावेळी माउलींच्या आणि तुकोबारायांच्या अश्वांचे गोल आणि उभे रिंगण इथे संपन्न होईल ते सगळं शब्दात रेखाटता येणारच नाही. ते पताकाधारकांचं धावणं, विणेकºयांचं धावणं, माउलींच्या अश्वाचं धावणं हे सारं जन्मजन्मांतरासाठी हृदयात साठवावं आणि प्राण ओठात आणून आजन्म ही वारी माझ्याकडून कधीच चुकू देऊ नको, असं मागणं त्या पांडुरंगाकडे भरल्या डोळ्यांनी ओरडून घाय मोकलून मागावं, असं वाटतंय.
माउलींच्या अश्वाच्या टपेखालची माती उचलून आपल्या भाळी लावताना जग जिंकल्यानंतर सुद्धा जी धन्यता आमच्या चेहºयावर दिसणार नाही, तो आंनद या वारकºयांंच्या चेहºयावर उमटतोय. या नि:स्सीम भक्तीने ओथंबलेल्या वारकºयांंच्या पायाखालची पायधूळ भाळी लावून धन्य व्हावं आणि या आनंदात स्वत:ला पूर्णपणे विरघळवून घ्यावं असंच वाटतंय.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: . Flood of joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.