अन्न आणि अन्नग्रहण हे अस्तित्वाच्या एकात्मतेचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 04:10 AM2019-07-03T04:10:09+5:302019-07-03T04:10:32+5:30
प्रत्येक दिवशी तुमच्या जेवणाच्या वेळेस ही सुंदर प्रक्रिया घडत असते.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
प्रत्येकाने जेवले पाहिजे, पण आपण जेवताना, त्या अन्नातून मिळणारे पोषण आणि आपल्या जीवनातील त्याचे योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जेवले पाहिजे. केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ल्यामुळे ते आपल्यावरच उलटण्याची शक्यता अधिक असते. असे बोलून मला खाण्यातील आनंद कमी करायचा नाही.
इतर कोणता तरी जीव तुमचाच एक भाग होण्यासाठी, तुमच्यात सामावून एक होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात विलीन होऊन तुमचाच एक भाग होण्यासाठी तयार आहे याची जाणीव ठेवणे यातच भोजनातला खरा आनंद आहे. एखादी गोष्ट, जी त्याच्याहून वेगळी आहे, ती त्याच्यात विलीन होण्यास राजी आहे याची जाणीव असणे, हा मानवी जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. यालाच आपण प्रेम असे म्हणतो. यालाच लोक भक्ती म्हणतात.
हेच आध्यात्मिक प्रक्रियेचे सर्वोच्च ध्येय आहे. मग वासना असो, उत्कट इच्छा असो, भक्ती किंवा आत्मज्ञान, या सर्व गोष्टी एकच आहेत, हा फक्त व्याप्तीचा प्रश्न आहे. हे जर दोन व्यक्तींमध्ये घडले तर आपण त्याला उत्कट भावना म्हणतो; असे जर मोठ्या जनसमूहात घडले तर आपण त्याला प्रेम म्हणतो; असे जर अनिर्बंध, व्यापक प्रमाणात घडले तर आपण त्याला अनुकंपा म्हणतो; आणि असे तुमच्याभोवती कोणतीच साकार गोष्ट नसताना घडले, तर आपण त्याला भक्ती म्हणतो. असे जर त्याच्या सर्वोच्च पातळीवर घडले, तर आपण त्याला आत्मज्ञान म्हणतो. अन्न आणि अन्नग्रहण हे अस्तित्वाच्या एकात्मतेचे प्रात्यक्षिक आहे.
प्रत्येक दिवशी तुमच्या जेवणाच्या वेळेस ही सुंदर प्रक्रिया घडत असते. जे एक रोप होते, जे एक बीज होते, जो एक प्राणी होता, किंवा मासा, किंवा पक्षी होता, तो आपल्यामध्ये विलीन होऊन मनुष्यप्राणी बनत आहे ही घटना अस्तित्वाच्या एकात्मतेचे तसेच प्रत्येक गोष्टीत सृष्टीकर्त्याचा सहभाग असल्याचे मूर्त स्वरूप आहे.