‘उपासनेची पाऊलवाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:46 AM2017-12-16T02:46:59+5:302017-12-16T02:47:27+5:30

डोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं.

'Footsteps of Fasting' | ‘उपासनेची पाऊलवाट’

‘उपासनेची पाऊलवाट’

Next

- कौमुदी गोडबोले

डोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं. बेसावध, गाफील राहिलं की गडबड होते. वर, खाली, उंच, सखल भागातून जाणारी पाऊलवाट माणसाला खूप शिकवून जाते. वळणा-वळणाची वाट जीवनाला वळण लावण्यास सहायक ठरते. सजग, जागृत राहिलं की चालताना खाली पडण्याचा, घसरण्याचा धोका संभवत नाही.
मोहाचे, लोभाचे क्षण सांभाळले की पाऊलवाट देखील योग्य ध्येयापर्यंत घेऊन जाते. प्रत्येकाला प्रशस्त मार्ग प्राप्त होईल असं नाही. कधी कधी छोट्याशा पाऊलवाटेनं चालणं क्रमप्राप्त असतं. ही वाट त्रस्त न करता माणसाला आश्वस्त करते. त्यामुळे अस्वस्थता दूर निघून जाते. उमेदीनं, उल्हासानं, उत्साहानं मार्गक्रमण केलं जातं. मग अडचणी, अडथळे यांचा बाऊ वाटत नाही. ऐन उन्हामध्ये देखील थंडावा प्राप्त होतो. अडखळलं, ठेचकाळलं तरी त्यामुळे होणाºया जखमांची तमा बाळगली जात नाही.
उंच जाताना धाप लागत नाही. प्रतिकूल वातावरणाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. ध्येयावर अविचल श्रद्धा असली तर पाऊलवाटही उपयुक्त ठरते. वाटेतल्या काट्यांची फुलं होतात. टोकदार दगड मखमली होऊन जातात. आजूबाजूची हिरवळ मनाला उभारी देते. झाडांच्या फांद्या थंडगार वारा घालू लागतात. रात्रीच्या अंध:कारात चांदण्यांचा चमचमता प्रकाश पाऊलवाटेवर पसरतो. त्यामुळे संकटाचं, अंधाराचं भय संपून जातं. माथ्यावर निळेशार आकाश, चंद्राची कोर, तारकांच्या माळा जीवन प्रवास सुखकर करतात. अशा छोट्याशा पाऊलवाटेवर भक्तीची भक्कम पावलं टाकली जातात. परमात्म्याच्या शक्तीवर अविचल निष्ठा असली की कठीण प्रवास सोपा होतो. निष्ठेसह जीवन प्रवास करताना निर्धार पक्का होत जातो. निष्ठा व निर्धार हातात हात घालून वाटचाल करतात तेव्हा निर्भयता येते. भीतीचा लवलेशही उरत नाही. आता पावलांना वेग येतो. भगवंत, भक्त, भक्ती यांची त्रयी त्रिविधता याला जुमानत नाही. मग ‘भवताप’ तरी कसा त्रस्त करू शकेल?
उपासनेची सश्रद्ध पाऊलवाट प्रकाशवाट होऊन जाते. विश्वात्मक शक्तीची मदत मिळू लागते.

Web Title: 'Footsteps of Fasting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.