क्षमा माणसाचे आयुष्य बदलू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 10:49 PM2019-02-02T22:49:21+5:302019-02-02T22:54:31+5:30

मित्रांनो क्षमा माणसाचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे समोरच्याला होईल तेवढी क्षमा करायला शिका.

Forgiveness can change a person's life | क्षमा माणसाचे आयुष्य बदलू शकते

क्षमा माणसाचे आयुष्य बदलू शकते

googlenewsNext

-डॉ. दत्ता कोहिनकर
बाळू रोज तालमीत जायचा. उत्कृष्ट शरीरयष्टी, चपळता व डावपेच यात त्याचा हातखंडा होता. राज्यस्तरीय स्पर्धेत बाळूने नाव कमावले होते. गावात सगळीकडे बाळूला मान-मरातब होता. 

एकदा बाजाराच्या दिवशी गाडी लावण्यावरून बाळूची एका भाजीवाल्याबरोबर बाचाबाची झाली. बाळूला कुस्ती क्षेत्रात मिळालेल्या यशामुळे त्याचा अहंकार खूप वाढला होता. त्यामुळे कसल्याही प्रकारचा विचार न करता बाळूने त्या गरीब भाजीवाल्याला जोरदार मारहाण केली व त्याला जोरात फाईट टाकून जमिनीवर आपटले. त्या भाजीवाल्याचे डोके दगडावर आपटल्याने रक्त येवू लागले. सदर भाजीवाल्याला मित्रांनी त्वरीत दवाखान्यात नेले. डॉक्टरने उपचार करण्यापूर्वी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. केस हाफ  मर्डरची होती. इन्स्पेक्टर भोईटे यांनी बाळूचे संपूर्ण रेकॉर्ड चेक केले. त्याच्या गावात, वस्तीवर त्याच्याविषयी चौकशी केली. यापूर्वी त्यावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता म्हणून त्यास कडक भाषेत तंबी देऊन लेखी हमी घेतली व भाजीवाल्याचा उपचाराचा खर्च दयायला सांगून त्याला माफी मागायला लावली.
 
थोड्याच दिवसांत बाळूने देशपातळीवर कुस्ती मारली व त्याला परदेशात कुस्तीस्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करून परदेशातही कुस्ती मारली. बाळू चॅनेलवर, टीव्हीवर, पेपरमध्ये सगळीकडे दिसू लागला. त्याची मोठी मिरवणूक काढण्यात आली. योगायोग बंदोबस्ताला भोईटे साहेबच होते. बाळू मिरवणूकीतच भोईटे साहेबांचा पाया पडला आणि त्यांना मिठी मारून म्हणाला, साहेब त्यादिवशी तुम्ही मला माफ केलं नसतं तर आज हाफ मर्डरची केस लागली असती, पासपोर्ट मिळाला नसता तर हा दिवस कसा बघायला मिळाला असता ? साहेब मी तुमचा खूप ॠणी आहे. खरोखर मित्रांनो क्षमा माणसाचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे समोरच्याला होईल तेवढी क्षमा करायला शिका. त्याने असे केले त्याठिकाणी मी असतो तर काय केले असते ? हा विचार करून आपला मानस स्थिर करा.

एक काल्पनिक गोष्ट आहे. एक शिक्षिका मुलांना सांगते तुम्हाला जेवढया लोकांचा राग येतो तेवढे पेरू व एक मोठे कापड उद्या येताना घेऊन या. दुसर्‍या दिवशी शिक्षिका मुलांनी आणलेले पेरू त्या कापडात बांधून त्यांच्या कमरेला बांधते व काही दिवस हे असेच राहून देण्याची सूचना करते. 5 व्या दिवशी एक मुलगा म्हणाला, मला झोपताना या पेरूंमुळे एकाच कुशीवर झोपून चमक भरली. दुसरा म्हणाला, मला खेळताच येत नाही, पेरूंमुळे भरभर पळता येत नाही. तिसरा म्हणतो, पेरू सडलेत - फार वास येतोय. चौथा म्हणतो फारच ओझं वाटतंय, त्यामुळे बैचेनी आली आहे. चारही मुलांना शिक्षिका म्हणाली-‘‘विद्यार्थ्यांनो कंबर तुमची, पेरू तुमचेच, कापड तुमचेच मग ज्याक्षणी त्रास जाणवला त्याक्षणी हे कापड सोडून पेरू फेकून का नाही दिले?’’ असेच अनेक पेरू आपण आपल्या कमरेला बांधून ओझे घेऊन आयुष्य काढीत असतो.

एखादी व्यक्ती आपला अपमान करते, मनाविरूध्द वागते, नाहक त्रास देते, हे ओझे आपण वर्षानुवर्षे घेऊन बसतो. काहीजण तर म्हणतात, त्याने माझा असा अपमान केला, सात जन्म विसरणार नाही. जन्मभर आपणच आपल्या मनाची हानी करत आपल्या शरीरात रक्तदाबासारोख्या अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. म्हणून ज्या गोष्टींमुळे आपले मन दुःखी होते त्या गोष्टींना सोडून देऊन संबंधित व्यक्तीला क्षमा करणे म्हणजे आपणच आपल्यावर कृपा करून आपले हित साधणे होय. म्हणून सर्व धर्मात क्षमायाचनेला खुप महत्व दिले आहे. क्षमा केल्यामुळे आपल्या मनातील द्वेषभावना कमी होते. मन शांत राहण्यास मदत होते. संबंध सुधारतात. प्रगतीचा टप्पा गाठण्यास सुलभता येते. मन हलके-फुलके राहते. लोकांचा विरोध मावळतो. जैन धर्मात पर्युषण पर्वानंतर ‘‘मिच्छामी दुक्कडम’’ म्हणत क्षमायाचना करण्याची तर इतर धर्मात मंगलमैत्रीच्या माध्यमातून क्षमायाचना करण्याची साधना शिकवली जाते. 

म्हणून इतरांनी केलेली हानी व अपमान आपल्याला सोडता आला पाहिजे. दुष्ट माणूस बदला घेण्याची, शहाणा माणूस माफ करण्याची व जाणकार मनुष्य दुर्लक्ष करण्याची इच्छा बाळगतो. एक गुरू व त्याचा शिष्य प्रवास करत असताना नदीकिनारी एक किशोरी तरूणी भेटते. नदीला पाणी वाढल्यामुळे तिला पलीकडे जाता येत नसते. तिच्या विनंतीनुसार गुरू तिला आपल्या खांदयावर बसवून पलीकडे सोडतात. हा प्रकार पाहून त्यांचा शिष्य दिवसभर विचारचक‘ात अडकून बैचेन होऊन सायंकाळी गुरूला म्हणतो, गुरूजी तुम्ही तर आम्हाला शिकवलं - स्त्री स्पर्श करू नये. परंतु तुम्ही तर त्या स्त्रीला खांदयावर घेऊन फिरलात. तेव्हा हसत गुरूजी म्हणाले, ‘‘मी तिला किनार्‍यावर केव्हाच सोडून दिले तू तिला अजुनही घेऊन बसलास का?’’ ही सोडून देण्याची कला शिकणे ही एक साधनाच होय. सॉक‘ेटिस पत्नीच्या शिव्या खाऊनही ती दमलेली दिसली कि तिची विचारपूस करायचा. सोडून देण्याची, माफ करण्याची कला सॉक्रेटिसने आत्मसात केल्यामुळे तो खडूस बायकोबरोबर राहू शकला. 

तुकाराम महाराज, गौतम बुध्द, येशू ख्रिस्त यांनी क्षमायाचनेचा उत्तम आदर्श घालून दिला. सुळावर चढवत असलेल्या लोकांविषयी येशू ख्रिस्त म्हणत होते, ‘‘हे पित्या यांना माफ कर, ही तुझीच लेकरे आहेत, ते काय करतात हे त्यांना कळत नाही.’’ या क्षमायाचनेमुळे त्यांना संतशिरोमणी म्हटले जाते. म्हणून क्षमायाचनेची साधना करा. डोळे मिटून शांतपणे बसा. ज्या व्यक्तीला आपण दुःखावले त्याला आठवून बंद डोळयासमोर त्याची प्रतिमा आणून त्याची माफी मागा व ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला असेल त्याची प्रतिमा बंद डोळयासमोर आणून त्यांना माफ करा. असे वारंवार केल्याने खरोखरच आपल्या सुप्त भावना संबंधित लोकांपर्यंत पोहचतात व संबंध सुधारण्याची प्रकि‘या चालू होते. पूज्य आचार्य गोएंकाजी म्हणतात, 

‘‘मै करता सबको क्षमा - करे मुझे सब कोय,
 मेरे तो सब मित्र है - बैरी दिखे ना कोय।’’
( लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत )

Web Title: Forgiveness can change a person's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.