परमार्थाचा सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 03:59 AM2019-01-21T03:59:23+5:302019-01-21T03:59:34+5:30

आपल्या निथळनिळ्या पाण्यासारख्या भारतीय तत्त्व विचारांत चार आश्रमांची संकल्पना मांडली आहे ती अशी आहे.

Fragrance of charity | परमार्थाचा सुगंध

परमार्थाचा सुगंध

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले
आपल्या निथळनिळ्या पाण्यासारख्या भारतीय तत्त्व विचारांत चार आश्रमांची संकल्पना मांडली आहे ती अशी आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास. आयुष्याच्या पूर्वार्धात ब्रह्मचर्याचे पालन करून शास्त्र अध्ययन करावे व गृहस्थाश्रमात उत्तम कन्यापुत्रांना जन्म देता-देता श्रममूल्यावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे. संसाराचा वेलू गगनावर जाईल तेव्हा फक्त त्रयस्थपणे फुलांचा सुगंध घ्यावा अर्थात संसारी असावे परि असुनि नसावे या भावनेने वानप्रस्थाने जीवन जगावे. आपल्या अनुभवाच्या शिदोरीतील प्रसाद पुढच्या पिढीस हवा असेल तेथे द्यावा नाही तर तटस्थ भावनेने आशीर्वाद द्यावा व शेवटी चित्रवृत्तीचा निरोध करून संन्यस्त वृत्तीने जगावे व एक दिवस आनंदाने मृत्यूचे स्वागत करावे. किती छान संकल्पना आहे ना! पण माशी तेथे शिंकते की अनेकांनी सर्वांचा मूलाधार असणारा गृहस्थी अर्थात संसारी माणूस खूपच त्याज्य व छोटा ठरविला. जो गृहस्थी संसारातील कर्तव्यकर्म पार पाडत हृदय मंदिरात भगवंतांची पावले विराजमान करतो. कधी ईश्वराच्या नामरूपात रंगून जाताना संत सावता माळी महाराजांच्या शब्दांत ईश्वरास करुणा भाकू लागतो.
का गा रुसलासी कृपाळू बा हरि
तुजवीण दुसरी भक्ती नेणे।
दीन रंक पापी हीन माझी मती
सांभाळी श्रीपती अनाथ नाथा।।
हळूहळू संसारिक गृहस्थाश्रमीही आपल्या आतील सुगंधाला विसरू लागला व आपले सारे सर्वस्व ज्यांनी संसाराचा कधी अनुभवच घेतला नाही त्यांच्या चरणी समर्पित करू लागला.

Web Title: Fragrance of charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.