Ganesh Chaturthi 2019: 'सुखकर्ता दु:खहर्ता...' ही श्रीगणेश आरती कोणी रचली आहे, तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 01:46 PM2019-08-26T13:46:25+5:302019-08-26T14:03:17+5:30
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. पण आपल्यापैकी अनेकजणांना बाप्पाची आरती कोणी रचली हे माहित नाही...
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. समर्थ रामदास स्वामींनी ही आरती रचली आहे. रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामाचे दास आणि हनुमानाचे भक्त. पण, गणपतीवरही त्यांची तितकीच श्रद्धा होती. त्यांनी आपल्या रचनेतून गणरायाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन इतकं नेमकेपणानं केलं आहे की, गणेशभक्तांना हे गणेश गौरव गान प्रसन्नतेची अनुभूती देतं. रामदासांनी रचलेली श्री गणेशाची आरती ही सात कडव्यांची आहे, पण आपण त्यातील तीनच कडवी म्हणतो. या गणेशोत्सवात आपल्या घरच्या बाप्पापुढे ही संपूर्ण आरती म्हणून पाहा... वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती बाप्पा मोरया!!