जिणे गंगौघाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:13 AM2018-07-12T00:13:49+5:302018-07-12T00:16:01+5:30
-इंद्रजित देशमुख
सुखानुभूतीचा अनुभव घेत माउलींची पालखी आज खंडेरायाचा निरोप घेऊन वाल्हेत विसावणार आहे, तर तुकोबाराय उंडवडीत विसावणार आहेत. पूर्ण वारीतील ज्ञानोबारायांच्या आजच्या विसाव्याचे गाव खूप विलक्षण आहे. काही गावे काही चांगल्या लोकांनी कामे करून नावारूपाला आणलेली असतात; पण एखाद्याने परिस्थितीच्या आहारी जाऊन वाईटपणाचा कळस करणे, कुणातरी सत्पुरुषाच्या स्पर्शाने पुनीत होऊन जाणे. त्यानंतर जीवनमार्ग बदलून वेगळ्या पण योग्य असलेल्या वाटेवरून चालायला सुरुवात करून नामांकित होणं आणि आपलं गावही नामांकित करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. असाच एक वाटमाऱ्या ज्याने पापाचा कळस केला; पण नारदांची भेट झाल्यावर जो आयुष्यच बदलून जगू लागला, असा एक महान कवी रामायणकार वाल्या कोळी यांचे जन्मस्थळ आणि साधनास्थळ म्हणजे वाल्हे.
व्यवहारी जगात एका चुकीबाबात एखाद्याला दोषी ठरवलं की, त्याला त्या चुकीबद्दल आयुष्यभर टोचत राहणे ही जगराहाटी आहे. याच चुकीबद्दल आयुष्यभर तो अपराधीपणाने होरपळत राहतो. अशा जगात ज्याच्याकडून नकळत अपराध घडलाय, त्याला मानव्याचं जगणं जगूच दिलं जात नाही. अशा जिवाला समाज मिसळून घेत नाही. त्याच्यात त्याने चांगुलपणा आणला तरी समाज त्याला स्वीकारत नाही. अशा अनंत प्रश्नांकित जीवनाला प्रेम, सहानुभूती व मानव्य याचे उत्तर देणारा एक वारकरी संप्रदाय आहे. वारीच्या मार्गातील हे वाल्या कोळ्याचे गाव अजूनही इथल्या डोंगरात जिथं वाल्या वाटमारी करून माणसाचे खून करायचा, एक माणूस मारला की आपल्याजवळील एक खडा जवळील रांजणात टाकायचा. असे खडे टाकून सात रांजण भरलेले असे ते रांजण व वापरलेला टोणपा इथं अवशिष्ट स्वरूपात आहेत. हे गाव आम्हाला सांगून जातं, इथं वाल्ह्या ही अफवा होती आणि वाल्मीकी हे सत्य आहे. माणसाचे रूपांतरण शक्य आहे याची ते साक्ष देते. परमार्थ हा समाजातील शहाण्या लोकांनीच करावा, अशी ठाम समजूत असलेल्या या रूढीला या संप्रदायाने क्रांती केली आणि हाकारून सांगितले.
‘‘या रे या रे लहान थोर।
यावी भलती नारी नर।।
नेणिवेत भरकटलेल्या गतायुष्याची कोणतीच बोचरी आठवण वर्तमानात अजिबात जोपासायची नाही. यासाठी माउली म्हणतात,
‘‘नेणिजे गतायुषे लज्जा जेवी’’
अशा भरकटलेल्यांसाठी तुकोबाराय सांगतात.
‘‘हरपल्याची नका चित्ती।
धक खणती वायाची।।
पावले ते म्हणा देवा।
सहज सेवा या नावे।।
जे आपल्या जवळून हरवून गेलंय मग ती वेळ असो, धन असो, मान असो किंवा कुवर्तन असो. ते चित्रात आणूच नका. देवाला पावले म्हणा आणि वर्तमानात जगत राहा. अशा पथभ्रष्ट जीवन जगणाºयांना तुकोबाराय सांगतात की,
‘‘मागे झाले पाहू नका।
पुढे जामीन आहे तुका।।’’
जिथे चुकीचे जगणाºयांना जवळचेदेखील आधार देत नाहीत, अशांचं वकीलपत्र घ्यायला तुकोबाराय तयार आहेत. किती व्यापकपणा आहे. या व्यापकतेची मर्यादाच नाही. एखाद्या चुकीमुळे समाजात पिचून जगणाºयांसाठी माउली म्हणतात,
‘‘ यालागी दुष्कृत जरी झाला ।
आणि अनुताप तीर्थी न्हाया।
न्हाऊनी मज आतू आला । सर्वभावेसी ।।’’
‘‘आणि आचरण पाहता सुभटा ।
जे दुष्कृताचा किर सेल वाटा ।
परी जीवित वेचिले चोहटा ।
भक्तिचिया की ।।’’
पूर्ण आयुष्य कसही असूदे, एकदा का त्याला अनुताप झाला की, तो परमार्थात अधिकारी बनू शकतो. अशा माणसाच्या आयुष्यातील अमावास्या संपून पौर्णिमा उगवते. ऋषिवर वाल्मीकी यांच्या या परिर्वतनाबद्दल एकनाथ महाराज म्हणतात,
‘नामपाठ करूनी वाल्हा तो तरला।
अधिकारी झाला रामनामे।।
शतकोटी कवित्व रामायण केले।
जडजीवन उद्धरिले तिन्ही लोकी।।
जनार्दनाचा एका बोलतसे वाणी।
नामपाठ अमृत संजीवनी घ्यारे भावे।।
नारदांनी केलेल्या बोधामुळे वाल्याने नामाचा पाठ केला व यातून अधिकारी होऊन दिव्य कवी झाले. स्वत: तरून इतरांना तारण्यासाठी शतकोटी रामायण हे काव्य केले. तुकोबाराय म्हणतात,
‘‘कोळियाची कीर्ती वाढली गहन।
केले रामायण रामा आधी।’’
एवढा मोठा अधिकार वाल्मीकींना प्राप्त झाला. या वाल्हेच्या भूमीत आल्यावर कुणालाही कमी न लेखता निव्वळ आणि निव्वळ मानव्याची जोपासना आणि संवर्धन करण्याचं बळ मिळतं.
नाही पुण्याची मोजणी।
नाही पापाची टोचणी।
जिणे गंगौघाचे पाणी।।
इथे वारी हा गंगौघच आहे. सर्वांना घेऊन जाणारा.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)