गणपती जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:01 AM2019-02-06T06:01:33+5:302019-02-06T06:01:46+5:30
खरे तर श्रीगणेश, ब्रह्मणस्पती तो निर्गुण निराकारच..़! गणपतीला प्रत्यक्ष तत्त्व म्हणले आहे..़ तो जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे. गणपती खरोखर ब्रह्म आहे. तो चैतन्यरूप आहे, आनंदमय आहे, तो सच्चिदानंद आहे.
- शैलजा शेवडे
श्रीगणेश ब्रह्मणस्पती, वर्णाया उत्सुक मती,
धडपडती शब्द किती, गणपती दे, बुद्धीस गती
जितके तुझ्याबद्दल वाचावे, ऐकावे, आनंद तर देतेच ते..़ पण मनात संभ्रम निर्माण होतो, नेमका आहेस तरी कसा तू... एकदंत, लंबोदर, शूर्पकर्ण, वक्रतुंड, गजमुख हे रूप मनास मोहित करतेच.़. हे सगुण सुंदर रूप तुझे वर्णन करतेच... पण त्याचवेळी अथर्वशीर्षातील त्याचे वर्णन सांगते, गणपती केवळ तुमच्यासाठी सगुण साकार झालाय बरं का...! खरे तर श्रीगणेश, ब्रह्मणस्पती तो निर्गुण निराकारच..़!
गणपतीला प्रत्यक्ष तत्त्व म्हणले आहे..़ तो जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे. गणपती खरोखर ब्रह्म आहे. तो चैतन्यरूप आहे, आनंदमय आहे, तो सच्चिदानंद आहे.
अर्थ - गणाच्या प्रारंभी ‘ग’ काराचा उच्चार. गण म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. तो पाय मोडलेला ग आहे. सर्व वाणीच्या आधी असलेला ‘अ’ घेतला. तो पाय मोडलेल्या गच्या ठिकाणी ठेवला. म्हणजे पूर्ण ‘ग’ झाला. नंतर परतर: अनुस्वार: आणि त्यानंतर अर्धचंद्राकार अनुस्वाराचा उच्चार करावा. या मंत्राचे पूर्वरूप ‘ग’ आहे. मध्यमरूप ‘अ’ आहे आणि अनुस्वार अन्त्यरूप आहे. बिंदू उत्तररूप आहे. एक नादात्मक, एकोच्चारणात्मक उच्चारण त्याला नादसंधान म्हणतात. एक अक्षरात्मक संहिता असते, एक नादात्मक संहिता असते. ही गणेशविद्या आहे. गणेशविद्या प्रदान करणारा हा गणक ऋषी आहे. छंद निचृतगायत्री आहे. या सूक्तामध्ये गणपती देवता आहे...
वाचताना मला ‘अमृतबिंदूपनिषद’ या पुस्तकात एक संदर्भ गवसला. त्यात लिहिले आहे, परमेश्वराचे स्वरूप चिदानंदात्मक आहे.चिद्रूप शक्तीहून भिन्न अशी परमात्म्याची अचिद्रूप शक्तीही आहे. तिलाच बिंदू असे म्हणतात. हिचेच दुसरे नाव महामाया हेच चिदाकाश म्हणतात. बिंदू ज्योतीस्वरूप आहे. या बिन्दुरूप ज्योतीमध्ये समग्र विश्व अभिन्नरूपाने भासमान होत असते. प्रणवाच्या अकार, उकार, मकार या तीन अवयवांनंतर चतुर्थ बिंदू आहे. बिंदूनंतर नाद येतो. बिन्दुरूप ज्योतीमध्ये अर्थाचा साक्षात्कार होतो, त्याचप्रमाणे नादात निखिल विश्वाचा, अनंत वाचकांचा, अनंत मंत्रांचा साक्षात्कार होतो. त्यामुळे कोणताही मंत्र चेतन झाल्यावर नादाच्या अवस्थेत परिणत होतो. गणेशाला आपण सिद्धीबुद्धीपती म्हणतो. कुणाला वाटते, सिद्धी, बुद्धी या गणपतीच्या दोन पत्नी आहेत. पण तसे नाही..़ मुद्गलपुराणात सांगितलं आहे, आत्ममाया किंवा योगमाया दोन प्रकारच्या शक्तींनी युक्त असते. पहिली शक्ती, ज्ञानशक्ती, हिलाच महाबुद्धी म्हणतात. दुसरी शक्ती बुद्धीला होणाऱ्या ज्ञानाला अनेक संभ्रमात टाकत ज्ञानाच्या स्वरूपात विकल्प निर्माण करणारी शक्ती. ती अनेकाविधाता दाखविते. त्याच्या स्वरूपाचे असंख्य पर्याय आपल्यासमोर ठेवते. या शक्तीलाच महासिद्धी म्हणतात. श्रीसिद्धीने श्रीबुद्धीस मोह घातल्याने देहाची निर्मिती होते आणि मग त्या बिन्दुरूपास देही म्हणतात. मूळ शुद्धरूप परब्रह्म गणनाथ जेव्हा आत्ममायेशी युक्त होतात, तेव्हा त्या मायामय रूपास बिन्दुरूप म्हणतात. चैतन्यरूप हे बिन्दुरूप आणि बहुविधाप्रकटीत देहीला बहुरूप म्हणतात. वेदांतशास्त्रात या बहुरूपासच त्वं आणि बिन्दुरूपास तत म्हणतात. देहात आसक्त जीवात्म्यास त्वं म्हणतात आणि उपाधिरहित चैतन्यास तत म्हणतात. आणि त्या मूळ चैतन्यापासून ‘तू भिन्न नाहीस’ हे सांगणारा महोपदेश असतो़