गीताई माउली माझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 03:33 PM2019-06-21T15:33:32+5:302019-06-21T15:33:41+5:30

भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद् गीता होय.

Geeta... a spiritual Mother | गीताई माउली माझी

गीताई माउली माझी

Next

भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद् गीता होय. प्राचीन भरतवर्षातील या ग्रंथाने मानवी जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे. अर्जुन या ग्रंथाचा नायक असून भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत. आपल्या प्राणसख्या असणा-या अर्जुनाला ते त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते. मानवी जीवन हे जेंव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो. मानवी जीवनात उत्पन्न होणा-या अनेक परस्थितीतींची व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने हा गीता विचार अंगीरावा. मानवाला जेव्हा आपले शरीर आणि मन यांच्या माध्यमातून अनेक दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्याने भविष्यकाराला आपला हात दाखविण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांना शरण जावून भगवद्गीतेतील परमेश्वरासोबत असलेल्या आपल्या वास्तविक संबंधाना समजून घेण्याची खरी वेळ जीवनातआलेली असते.

भगवगद्गीता ही सर्वांची माउली असून, सर्वांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय? ते प्राप्त करण्यासाठी तू कोणते कर्म करीत आहेस ? असा प्रश्न विचारीत असते व त्या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी सदोदीत मार्ग दाखवित असते. गीतेचा कर्मसिद्धांत हा मानवी जीवनाला मिळालेला अमृतकुंभच होय. त्या एका सिंद्धाताचे पालन जरी प्रत्येकाने केले तर आज मानवी जीवनातील असंख्य समस्यांना निश्चितच उत्तर सापडेल. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुद्धा तोच महत्त्वाचा विचार सांगितला होता. तू तुझे नियत कर्म कर; परिस्थीती कोणतीही असो. अर्जुनाने जेव्हा युद्धामध्ये माझ्या समोर
माझे काका, मामा, गुरू आहेत. युद्ध कसा करू? असा प्रश्न केला तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना तू कर असे सांगीतले. तुझे कर्मच तुला तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आहे.

यत्करोषि यदक्श्र्नासि ददासि यत् ।
यत्पस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व सदर्पणम।। गीता (९/२७ )

स्वतःच्या कर्मानेच मनुष्य हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत असतो. स्वकर्मेच त्याला विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात. ज्ञानप्राप्तीनंतर जशी कर्माची चिंता उरत नाही, त्याप्रमाणेच जीवनामध्ये कर्मयोगाला जर आत्मज्ञानाची जोड दिली, तर जीवन कृतकृत्य होते. जेव्हा मनुष्य आपले जीवनाचे मुळ ध्येय विसरतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या मुळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात. हा गीतेतील महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या पाच तत्वांचे महत्त्वाचे विस्तृत वर्णन आलेले आहे. पहिले चार तत्त्व जरी मानवी जीवन
शक्तीच्या बाहेरील असले तरी. मनुष्याने कर्ममार्गाचे आचरण करावे. ईश्वराने दिलेले नियत जीवनमान योग्य कर्म करून जीवन आनंदीत करण्यासाठी आहे. रडत बसण्यापेक्षा नियत कर्म करा, हा सिद्धांत जर सर्वांनी अंगिकारला तर जीवनातील असंख्य प्रश्नांना उत्तरे आपोआपच सापडतात. हा गीताविचार सर्वांनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन ।
मा कर्मफलेहेतूर्भूर्मा ते संङगोSस्तवकर्मणी ।। २/४७

हा जीवनकर्मविचार केवळ एक विचार नसून ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांसारख्या प्रभूंनी दिलेला जीवनसुखमयतेचा महत्त्वाचा संदेश आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी कर्माची महती आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगीतली आहे.

एरवी जग हे कर्माधीन । ऐसि याची व्याप्ती गहन ।
परी ते असो आईके चिन्हं प्राप्ताचे गा ।। ( ज्ञाने. ४/९२)

जग तुम्हाला कधीही लक्षात ठेवत नाही तर तुम्ही केलेल्या कर्मांनाच आठवत असते. मग ते कर्म तुम्हाला चांगले म्हणून ओळखतात किंवा वाईट म्हणून ओळखतात. त्यासाठी कर्मविचारच गीताई माउलीचा जीवनविचार आहे. असे या श्लोकातून गीताई आपल्याला संदेश देत आहे.


यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानी मनीषिनाम।। ( गीता १८/५)

 

 

- डॉ. हरिदास आखरे

Web Title: Geeta... a spiritual Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.