प्रेम देवाचे देणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:57 AM2019-11-18T03:57:28+5:302019-11-18T03:58:14+5:30
प्रेम जसजसे व्यापक होत जाते, तसतसे झाडा-माडावर, गुरां-पाखरांवर, मुला-बाळांवर अन् समाजातील प्रत्येक घटकाला ‘लळा’ लावण्याचा अंतरंगी जिव्हाळा निर्माण होतो.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
प्रेम! केवळ अडीच अक्षरी शब्द. ज्याच्या प्राप्तीसाठी सीता वनवासी झाली. तर वृंदेच्या प्रेमासाठी हरी वृंदावनवासी झाला. प्रेमानेच माणसाला जगण्याचा प्रकाश दिला. प्रेमानेच नातेसंबंधाची वीण एवढी घट्ट विणली गेली आहे की, जोपर्यंत सजीव सृष्टीचे अस्तित्व राहणार आहे, तोपर्यंत आई-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, भक्त-भगवंत यांच्या प्रेमाची जलधारा जगाला हिरवेगार करणार आहे. ज्या दिवशी ‘प्रेम’ नष्ट होर्ईल, त्याच दिवशी माणसाचे यंत्र होईल आणि विश्वाचे वैराण वाळवंट होईल. प्रेमाचा विकास जेव्हा ‘तो’ आणि ‘ती’च्या पलीकडे जातो तेव्हा माणसाच्या अंत:करणाचा खरा विकास होतो. प्रेम जसजसे व्यापक होत जाते, तसतसे झाडा-माडावर, गुरां-पाखरांवर, मुला-बाळांवर अन् समाजातील प्रत्येक घटकाला ‘लळा’ लावण्याचा अंतरंगी जिव्हाळा निर्माण होतो, यालाच तर तुकोबांनी देवत्वाची उपमा देताना म्हटले आहे -
प्रेम देवाचे देणे । देह भाव जाय देणे ।
न धरावी मने । शुद्धी देश-काळाची ।
मुक्त लज्जा विरहित । भाग्यवंत हरिभक्त ।
झाले ओसंडत । नामकीर्ती पोवाडे ।
जोडी जाहली अविनाश । जन्मोनी झाले हरिचे दास।
हेचि वाहती संकल्प । पुण्य प्रसंगाचे जप ।
तुका म्हणे पाप । गावी नाही हरिजना ॥
जेव्हा मनाची परडी प्रभुप्रेमाची फुले वेचण्यासाठी आतुर होते, तेव्हा देहभाव नष्ट होऊन भक्तच प्रेमाचे मूर्तिमंत रूप होतो. आत्मिक प्रेमाच्या सर्वोच्च अवस्थेत जेव्हा प्रेमयोगी पोहोचतो तेव्हा देश, काळ, स्थळाची भौतिक बंधने आपोआपच गळून पडतात आणि तो कधी त्याची मुरली, वैजयंती, पितांबर, मोरमुकुट होऊन जातो अन् प्रभुप्रेमाची माधुरी अनुभवतो. धरतीतून अंकुरणारा अंकुर धरतीच्या प्रेमाची ऊब अनुभवतच आकाशगामी होतो. पक्षिणीच्या घरट्यातील छोटेसे पिल्लू आईच्या पंखाखाली साऱ्या दुनियेतला नि:शब्द आनंद अनुभवते, तर मातेच्या कुशीत विसावणारे बालक वात्सल्याच्या भावगंगेत न्हाऊन जाते. तसेच माणसाचे प्रेमसुद्धा विकास पावलेल्या मनाचा सुगंध आहे. हेच प्रेम जेव्हा प्रभुप्रेमाच्या दिव्य साम्राज्यात पोहोचते तेव्हा नाना साधनांच्या खटपटांचा उद्योग आपोआपच थांबतो. प्रभुप्रेमाच्या वात्सल्याने देहभान हरपलेल्या सुरदासांना केवळ यशोदा आणि श्रीकृष्णाच्या वात्सल्यात प्रेमाचा साक्षात्कार झाला नाही, तर घराघरांतील अंगणात रांगणाºया बालकांमध्ये कृष्णप्रेमाचा साक्षात्कार झाला. नरसी मेहताच्या हुंडीतून तो आपल्या प्रेमाची बासरी वाजवू लागला. प्रभुप्रेमाचे पैंजण पायात बांधून ज्याच्या प्रेमाची आयुष्यभर एकांत आराधना करणारी प्रेमदिवानी मीराबाई तर म्हणू लागली -
हारी मा दरद दिवानी, मेरा दरद ना जानै कोई ।
घायाल की गत घायाल जानै, हिवडो अंगण संजोई ।
हृदयाचे अंगण ज्याच्यासाठी झाडून पुसून स्वच्छ केले तो गिरीधर गोपाल जर हृदयाच्या अंगणात खेळायलाच आला नाही, तर भक्ताच्या हृदयाला होणारी जखम इतरांना कशी कळणार? कारण प्रेम वियोगाने जखमी होणाºयालाच जखमी होण्याच्या वेदना कळतात. हातात बाण घेऊन त्याची शिकार करणाºया शिकाºयाला या वेदना कधी कळत नाहीत. ईश्वरी प्रेमनिष्ठेबरोबच मानवजातीमध्ये प्रेमाचे संवर्धन व्हावे, यासाठी साºयाच संतांनी आपल्या अलौकिक प्रेमभावनेचे लौकिक स्तरावर येऊन वर्णन केले व प्रेमाच्या अनन्यतेविषयी इशारा देताना सांगितले -
प्रेम न बाडी उपजे, प्रेम न घाट बिकावें ।
राजा-परजा जेहीं रुचे, सीस देई लई जाएँ ।