आनंद तरंग - निष्काम कर्मयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:21 AM2019-06-15T06:21:06+5:302019-06-15T06:21:09+5:30
वामनराव देशपांडे ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे आणखी दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादन करताना भगवंतांनी एक अत्यंत ...
वामनराव देशपांडे
ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे आणखी दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादन करताना भगवंतांनी एक अत्यंत महत्त्वाचा तत्त्वविचार अधोरेखित केला की या ज्ञानप्राप्तीसाठी कोणा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पुरुषोत्तमाच्या ज्ञानसहवासात राहण्याची आवश्यकता नाही. कारण हे भगवंतांना अभिप्रेत असलेले ज्ञान, निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त करून घेणे, कुणाही साधक भक्ताला सहज शक्य आहे. ‘मी’पण एकदा का गळून पडले की, करीत असलेल्या कर्माचे कर्तेपण संपुष्टात येते. आपण कर्म करीत नसून भगवंतच आपल्याला प्रेरणा देऊन हे कर्म आपल्याकडून करवून घेत आहे हा सद्भाव एकदा का शुद्धाचरणी अंत:करणात सतत स्फुरण पावत राहिला की मर्त्य मानवी जीवनातले कर्तेपण आणि फलाशा अक्षरश: भस्मिभूत होऊन जाते. तोच तर शुद्ध ज्ञानाचा अपूर्व दिव्य क्षण असतो.
या निष्काम कर्मयोगाचे तत्त्व एकदा का चित्तात स्थित झाले की, कर्तृत्वाचा अभिमान पूर्णपणे नष्ट होतो. तेव्हाच कर्म करूनही साधक भक्त अकर्माचा आनंद उपभोगू शकतो. म्हणजे काय तर, सर्व कर्ते अकर्म होतात. फलप्र्राप्तीची इच्छाच निर्माण होत नाही. सत्य काय तर निष्काम कर्मयोगी साधक कर्मफलाशी संबंधित राहत नाही. त्यामुळे सुख-दु:खे त्याला स्पर्शच करीत नाहीत. भगवंतांनी अशा साधक भक्तांना उद्देशून ‘योगसंसिद्ध:’ असे म्हटले आहे. म्हणजे काय तर ‘ज्याचा हा निष्काम कर्मयोग’ उत्तम प्रकारे जन्मक्षणीच सिद्ध झाला आहे असा श्रेष्ठ सिद्ध पुरुष, कर्म करूनही कर्मापासून अलिप्तच राहतो. सहसा प्रत्येक मानवी जीव करीत असलेल्या प्रपंचात देहबुद्धीने अडकतो. त्यामुळे असा दुर्दैवी जीव प्रापंचिक वृत्तीने सभोवताल अनुभवत राहतो आणि मानवी सुखदु:खाच्या वेगवान चक्रावर फिरत राहतो. परंतु ज्या भाग्यवान जीवाला तत्त्वज्ञानाची सोबत मिळते, तेव्हा त्याच्या पवित्र श्रद्धेय जीवनाला खरी सुरुवात होते.