देव सगळीकडे, पण मन एकाग्र करायला मूर्तिपूजा सोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:56 AM2019-05-10T05:56:14+5:302019-05-10T05:56:26+5:30
परमेश्वर तर आसमंत व्यापून राहिला आहे. मग तरी आपण मूर्तिपूजा का करतो? देवळात का जातो? का डोळ्यांसमोर एक सगुण रूप आणतो? का आपण सगुणोपासना करतो?
- शैलजा शेवडे
नाही कळस मंदिर, नाही कुठला देव्हारा
सारे आसमंंत आहे, त्याचा गाभारा गाभारा
खरंंतर प्रत्येकाला तसं माहीत असतं, देव केवळ या मूर्तीत नाही. परमेश्वर तर आसमंत व्यापून राहिला आहे. मग तरी आपण मूर्तिपूजा का करतो? देवळात का जातो? का डोळ्यांसमोर एक सगुण रूप आणतो? का आपण सगुणोपासना करतो? ज्ञानी लोक निर्गुण निराकाराला जाणण्यासाठी तळमळतात. पण आपल्याला देव म्हटले की डोळ्यांसमोर एखादी मूर्तीच पाहिजे असते.
भागवतात एक अतिशय सुंदर प्रसंग वर्णन केला आहे. कृष्ण मथुरेत गेल्यावर त्याच्या विरहाने गोपी व्याकूळ झाल्या आहेत. तेव्हा उद्धव येतो. गोपींना समजावतो, ‘तुम्ही समजता तसा कृष्ण माणूस नाही. सामान्य नाही, तो तर परमात्मा आहे. अणुरेणूत कृष्णतत्त्व भरले आहे ते ओळखा, त्याची उपासना करा.’ पण गोपींना पटत नाही हे तत्त्वज्ञान. त्या म्हणतात, ‘आम्हाला आमच्याबरोबर हसणारा, रास खेळणारा, रुसणारा, तर कधी आम्ही रुसलो की आमची समजूत काढणारा कृष्ण पाहिजे.’ आपलं मनही तसंच असतं.
आपल्याला देवापाशी काही मागायचं असतं, देवाला आपली सुख-दु:ख सांगायची असतात. देवापाशी हट्ट करायचे असतात. कधी देवावर रुसायचं असतं, रागवायचं असतं... तर कधी पूजा, धूप, फुलंं याच्यामुळे मनाला एक आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं. खरंतर तसं पटतही असतं. देव सगळीकडे भरला आहे. पण मन एकाग्र करायला मूर्तिपूजा सोपी पडते. एकदा मन एकाग्र झालं, की मगच त्याच्या सर्वव्यापित्वाचा अनुभव येतो.
देव अंतरातही, देव अंबरातही,
मोहवी मनास जे, देव त्या सुरांतही