तत्वाचरण शिकविणारे भगवान महावीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:36 AM2019-04-17T10:36:29+5:302019-04-17T10:37:16+5:30
चोविसावे तीर्थंकर म्हणून इ. स. पूर्व ५९९ मध्ये कुडलपूर येथे राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्यापोटी वर्धमान भगवान महावीर यांचा जन्म झाला.
चोविसावे तीर्थंकर म्हणून इ. स. पूर्व ५९९ मध्ये कुडलपूर येथे राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्यापोटी वर्धमान भगवान महावीर यांचा जन्म झाला. जन्मनाव वर्धमान ठेवण्यात आले असले तरी त्यांना महावीर, वीर, अतिवीर, सन्मती ही नावे त्यांनी बालपणी केलेल्या अतिविशेष कार्यामुळे देण्यात आली.
महावीर जन्माने राजपुत्र असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात कधी राज्यकारभार केला नाही. कारण जन्मापासूनच त्यांची मानसिकता वैराग्य भावनेची होती. त्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांच्यातील वैराग्य भावनेने संसार भावनेवर मात केली. स्वयंप्रेरणेने सर्वस्वाचा त्याग करीत त्यांनी मुनीदीक्षा धारण केली व आपल्या अंगीकृती व आपल्या अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पाच महाव्रतांना धारण करून त्याचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली.
भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म:। धर्मस्य मूलं दया।’ जगा व जगू द्या आणि ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ या दोन संदेशाचा जनमानसावर इतका सखोल परिणाम झाला की, त्यामुळे समाज अहिंसक बनून स्त्री-पुरुष असमानता व पशुपक्ष्यांना यज्ञयागात बळी देण्याची प्रथा एकदम थांबली. मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो, या महावीर प्रणीत तत्त्वाने जनमानसातील वर्णवादास व उच्च-नीचतेच्या भावनेस तिलांजली मिळाली.
भगवान महावीरांनी सांगितलेल्या तत्त्वांचा राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्यावर विशेष प्रभाव होता हे त्यांनी अंगीकारलेले अहिंसेचे धोरण, त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग तसेच त्यांनी अपरिग्रही व अनेकांतवादी दृष्टी यावरून स्पष्ट दिसून येते.
वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांनी ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयू, नाम, गोत्र व अंतराय या आठही कर्माचा क्षय केला व इसवी सन पूर्व ५२७ कार्तिक कृष्ण अमावस्या या शुभदिनी बिहार राज्यातील ‘पावापुरी’ या तीर्थस्थानी मोक्षाची प्राप्ती केली. भगवान महावीरांना मोक्षप्राप्ती झाल्याने त्या दिवशी असंख्य दिवे लावून व गुढ्या, तोरणे उभारून लोकांनी दिवाळी साजरी केली. तीच दिवाळी आपण आजही त्याच पद्धतीने साजरी करून भगवान महावीरांचे व त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे स्मरण व चिंतन करून त्यानुसार आचरण करण्याचा आपण प्रयत्न करतो.
जैन धर्मास अतिप्राचीनतेचे ऐश्वर्य लाभलेले आहे. त्यांनी क्रोध, मान, माया, लोभ अशा विकारांवर विजय प्राप्त केला आहे. इंद्रिये इच्छांना जिंकले आहे. ते ‘जिन’ असे मानले जाते. या जिनाचे अनुयायी ते जैन धर्मात जिनेंद्रांना तीर्थंकर म्हणतात. वृषभदेव ते महावीर असे २४ तीर्थंकर आहेत.
जैन धर्मात सर्वतोपरी मनुष्याला महत्त्व आहे. तीर्थंकरांनी सर्व प्राणी-मात्रांच्या कल्याणाचा आदर्श जगापुढे उभा केला. धर्माच्या व तीर्थांच्या सहायाने या भवसागरातून तरून जाता येते, असा उपदेश तीर्थंकरांनी दिला. सर्व प्राणी-मात्रांमध्ये चैतन्यरूपी आत्मा आहे. त्या आत्म्यास जाणणे हाच जैन धर्माच्या तत्त्वचिंतनाचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा यज्ञामध्ये बळी देण्याची प्रथा प्रचलित होती, सर्वत्र हिंसेचे प्रमाण वाढले होते, त्यावेळी आत्म्याच्या सन्मानासाठी भगवान महावीरांनी ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश दिला. अंधश्रद्धा, चमत्कार, नवस-सायासांना जैनधर्म पुष्टी देत नाही. ‘तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ हाच मौलिक विचार जैनधर्माकडून आपल्याला मिळतो.
जैन समाजात परस्परांना ‘जय जिनेंद्र’ असे संबोधून परस्परांना जिनेंद्र आत्म्यास वंदन असे म्हणण्याची सुंदर प्रथा आहे, म्हणून जैन धर्म यशस्वी जीवन जगण्याची कला शिकवतो.
- प्रदीपकुमार शिंगवी
(लेखक हे उद्योग क्षेत्रात आहेत.)