देव आभाळी,सागरी...देव आहे चराचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:50 PM2019-02-23T13:50:56+5:302019-02-23T13:51:59+5:30

जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय.

God is in sky, marine ... God is in everthing | देव आभाळी,सागरी...देव आहे चराचरी

देव आभाळी,सागरी...देव आहे चराचरी

Next

का रे न आठविसी कृपाळू देवासी।
पोसितो जगाशी एकला तो।।
बाळा दुधा कोणी करिले उत्पत्ती।
वाढवे श्रीपती सवे दोन्ही।।

मी म्हणजे सर्वकाही आणि मीच हा सर्व जगाचा व्यवहार चालवितो. अशा भ्रमात माणसे जगत आहेत. परंतु जगाचे रहाटगाडगे आघात शक्ती धारक चालवितो. ही बाब आपण जवळपास विसरलो. जगण्याची सोपी संस्कृती म्हणजे ज्या विधात्याने सर्वांची उत्पत्ती केली आहे त्याचे स्मरण करून सत्कार्य करत राहणे हे होय. 'स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे' असे संत तुकाराम महाराज सांगतात. भक्तिमार्गात स्मरण भक्ती श्रेष्ठ मानली जाते. मात्र श्रवण, वंदन, अर्चन, दास्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे प्रकार वर्णन केलेले आहेत. कर्तुत्व शक्ती ही खरी ईश्वराची आहे. तिथं अहंकार चालत नाही. मी करणार आहे, करू शकेन व्यर्थ कर्तुत्व अभिमान आणि अहंकार सृष्टीस मान्य नाही.

परी मने वाचा देहे। ऐसा तो व्यापार नव्हे।
 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी हेच वरील ओवीत सांगितले आहे. इंद्रियांचा अधिपती हा ईश्वर आहे. पंचमहाभूतांना शास्त्रकारांनी एक जड पदार्थ गणले आहे. त्यांचा नियामक वेगळा आहे. तेजाच, पृथ्वीच, वायूच, नियमन करतो. तोच नियामक असून तोच सर्वांच्या हृदयात बसलेला आहे ही ईश्वराची मोठी शक्ती आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर स्मरण आणि विस्मरण असते. त्यातील स्मरण म्हणजेच ईश्वर असे समजले जाते. तत्त्वरूपाने ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. पण त्याला ओळखल्याशिवाय जीवाला समाधान लाभत नाही. चैतन्याने चैतन्याद्वारा चैतन्याला पहावे. म्हणजेच देवदर्शन. खरे बोलणार व वागणारा देवाला आवडतो. ईश्वराच्या इच्छेनुसार वागावे, यासारखे सुख नाही. परपीडा म्हणजे दुःख तर परम समृद्धी म्हणजे सुख असे मानावे लागते. आपल्या जीवनात आपण लहान-मोठे अनेक निर्णय घेत असतो. आपणास निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी हीच शक्ती आपणास साह्य करीत असते. ईश्वराच्या अस्तित्वालाही आपण दाखवू किंवा नाकारू देखील शकत नाही. याबाबतीत अनेक तर्क आणि वितर्क असू शकतील. परंतु 'जग हे चाले कोणाच्या इशारे' हादेखील पटणारा युक्तिवाद आहेत. ज्या ठिकाणी विज्ञान संपते त्या ठिकाणी ईश्वरी लीला सुरू होते. असे म्हटले जाते म्हणूनच मनुष्यदेहात असणारे सर्व आपण त्या ईश्वराचे अंश आहोत. आपला जीवाला ते अनुभवता येणे म्हणजे आत्मज्ञान.

मानवी मनाला उभारी देणारी, गेलेला आत्मविश्वास परत प्राप्त करून देणारी, व सकारात्मक विचार इतरांपर्यंत पोहोचवणारी ऊर्जा म्हणजेच ईश्वर आहे. ही काळाच्या ओघात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा ओलांडली. आणि नकारात्मक विचारांचा पगडा वाढायला लागला. त्यातूनच हे युद्ध सुरू झाले म्हणूनच म्हटले जाते की 'देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे आभाळी सागरी देव आहे चराचरी'. माणूस जेव्हा सुखाची अनुभूती घेत असतो. तेव्हा त्यास विश्व निर्मात्याचा पूर्णपणे विसर पडतो. आणि तो जगविजेत्याचा  अविर्भावात वावरत असतो. परंतु जसे तो दुःखात आणि अपयशात मार्गक्रमण करतो. तसे तो परमात्मा, ईश्वर, अशा विविध नावाने नटलेल्या अगाध शक्ती चा आधार घेतो. तेव्हा कुठे त्या उपरती झाल्याचे दिसून येते.

तात्पर्य काय तर सकारात्मक विचार हे मानवाला क्रयशक्ती वाढून स्वतःच्या व समाजाच्या प्रगतीसाठी साधन ठरते. तर नकारात्मक विचार हे बाधक ठरतात. मनाचे स्थैर्य व आनंद मिळवायचा असेल तर आघात शक्तीचे सामर्थ्य नाकारून चालणार नाही.

- डॉ. भालचंद्र संगनवार ( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

Web Title: God is in sky, marine ... God is in everthing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.