हृदयातील भगवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 04:32 AM2018-12-14T04:32:01+5:302018-12-14T04:32:43+5:30
कोणी म्हणलं, परमेश्वर तर आपल्या हृदयातच आहे. आपल्या हृदयात परमेश्वर...! किती आनंददायी आहे ना ही जाणीव?
- शैलजा शेवडे
लंडनला असताना इस्कॉनचे लोक पाहिले. त्यांनी भारतात येऊन वृंदावनाला भेट दिली होती. तेथील माती अत्यंत भक्तिभावाने गळ्यातील ताईतात घातली होती. जिथे श्रीकृष्णाची त्यांच्या परमदैवताची पावले कधी काळी पडली होती ती जागा, तिथली माती त्यांच्यासाठी पूजनीय होती. एकदम मन थरारलं. खरंच इथे श्रीकृष्णाची पावलं पडली असतील? नंतर नाशिकला गेले, तेव्हाही मनात एक आनंद. खरंच इथल्या मातीला श्रीरामाच्या पावलांचा स्पर्श झाला असेल? परमेश्वर खरंच कधी अवतारला असेल? कुणीतरी कानात गुणगुणलं, परमेश्वर तर केवळ तीर्थक्षेत्रीच नाही, सगळीकडे आहे. पण मनाला ती पोपटपंची वाटली. इतकं सोपं कुठाय त्याचं जाणवणं. मन हताश झालं. कोणी म्हणलं, परमेश्वर तर आपल्या हृदयातच आहे. आपल्या हृदयात परमेश्वर...! किती आनंददायी आहे ना ही जाणीव? पण तरीही कळत नाही, तो सर्वव्यापी परमेश्वर आपल्या हृदयात कसा असेल..? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात,
सर्वस्य चाहं हृदि सिन्नविष्टा-मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
म्हणजे सर्व जीवांच्या हृदयात मी आहे. पण आपल्या मनात शंका येते, कशावरून समजायचं की, तो आपल्या हृदयात आहे? तर प्रत्यक्ष भगवानच म्हणत आहेत, मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । म्हणजे, आठवण, ज्ञान, अज्ञान, सगळं माझ्यापासूनच आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात स्पंदन होते, आकुंचन प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्त पोचवले जाते आणि शरीराकडून रक्त हृदयाकडे खेचले जाते. प्रत्येक पेशीत असलेला न्युक्लिअस प्राणशक्ती स्पंदित करतो. म्हणजेच परमेश्वर हृदयात आहे.