हृदयी प्रगटे जनार्दन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 03:41 PM2019-01-28T15:41:58+5:302019-01-28T15:43:14+5:30
कीर्तन भक्तीत मानवाला महामानव बनविण्याची अद्भुत शक्ती आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कीर्तन भक्तीचे स्थान अनन्यसाधारण आहे. मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, बंधुता, समता, एकता या जीवनमूल्यांचा विचार आचारसंपन्न व्हावा व माणूस ‘आचारें विचारें पैलपार पावावा, यासाठी महाराष्ट्रांतील संतांनी कीर्तन भक्तीच्या माध्यमातून धर्म जागरण केले. कीर्तन भक्तीत मानवाला महामानव बनविण्याची अद्भुत शक्ती आहे. कीर्तन भक्तीतली ही अपूर्व शक्ती संतांनी ओळखली. या शक्तीचा उपयोग व्यष्टी आणि समष्टीच्या ऐहिक व पारलौकिक कल्याणासाठी केला.
नामदेव-ज्ञानदेवादिक संतांनी पंढरीच्या वाळवंटात ममतेच्या तीरावर समतेचे नंदनवन केले, ते याच कीर्तन भक्तीतून...!
या रे या रे लहान थोर । याती भलते नारी नर ।।
बहुजन समाजाला अशी आर्त साद घातली. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, लहान-थोर, अंत्यज-ब्राह्मण अशा जातीवादाच्या भिंती उखडून टाकल्या. भागवत धर्माच्या ध्वजाखाली सर्वांना एकत्र आणले. देव हा फक्त देवळापुरताच सीमित नाही, तो प्रत्येकाच्याच अंतरंगरात आहे. जो तुमच्यात आहे, तोच माझ्यात आहे. पिंडात आहे, तेच ब्रह्मांडात आहे. सर्वांच्या अंतर्यामी त्याचाच आविष्कार आहे. मग द्वेष, मत्सर, आपपरभाव, वैरभाव कुणी कुणाचा करावयाचा...? हृदयस्थ परमेश्वराला ते रुचेल का, पटेल का? असा मौलिक विचार कीर्तन भक्तीनेच समाज मनात रुजविला. म्हणून तर शतकानुशतके उलटली तरी कीर्तन भक्तीचे स्थान जनमानसात अढळ आहे.
वर्तमानकाळात मनोरंजनाची अनेक साधने आली तरी कीर्तन परंपरेचे महत्त्व कमी झालेले नाही.
आज निर्माण होणारी बहुतांशी मनोरंजनाची साधने ही मानवी मनाला विकाराकडेच प्रवृत्त करतात. अशा भयावह परिस्थितीत समाजधारणेचे मूल्य जनत होण्यासाठी कीर्तन संस्थेसारख्या प्रभावी प्रबोधन संस्थेची नितांत गरज आहे. कीर्तन भक्तीत माणसातील देवत्व जागे करण्याची क्षमता आहे. कीर्तन करतानाच व ऐकताना हा भावानुभव येऊ शकतो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ।।
प्रेमे छंदे नाचे झेले । हारपले देहभान ।।
किंवा
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ।
भाग्य तरी ऋणी देव ऐसी ।।
वर्तमान काळात अविचारी धनिकांची आणि अविवेकी माणसांची संख्या बळावत आहे. चंगळवादाने उग्र रूप धारण केले आहे. संयमाचा त्याग करून, स्वैराचाराकडे धाव घेणारा हा प्रवास दिवसेंदिवस असाच वाढत राहिला तर नंदनवाचे रणकंदन व्हायला कितीसा वेळ लागेल...? अशा भयावह, अस्थिर परिस्थितीत संतांचा भगवा ध्वज हातात घेऊन, टाळ-चिपळ्यांच्या नादात समाजाला जीवनमूल्यांचे भान देण्याचे कार्य कीर्तन परंपरेला नव्या जोमाने करावे लागेल.
ज्यावेळी अधर्म हा धर्म होतो, अशुद्धी चित्ताला ग्रासते आणि विकार विवशतेचे ग्रहण संपूर्ण जीवनाला अवकळा आणते, अशा वेळी काय करावे? शांतिसागर एकनाथ महाराज म्हणतात,
कीर्तनें स्वधर्म वाढे । कीर्तनें चित्तशुद्धी जोडे ।।
कीर्तने परब्रह्म आतुडें । मुक्ती कीर्तनापुढे लाजुनी जाय ।।
दूरितांचे तिमिर नष्ट करून स्वधर्माचा प्रकाश देण्याचे सामर्थ्य कीर्तन भक्तीत आहे. सगळ्याच संतांनी कीर्तन भक्तीचे महात्म्य वर्णन केले आहे. महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार नामदेव महाराज वर्णन करतात -
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।।
वैराग्यमूर्ती तुकाराम महराज कीर्तन भक्तीचे लक्षण सांगताना म्हणतात -
तरले तरती हा भरवसा । कीर्तन महिमा हा ऐसा ।।
आवडी करिता कीर्तन । हृदयी प्रगटे जनार्दन ।।
राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधात कीर्तन भक्तीची आचारसंहिता सांगितली. कीर्तन भक्तीचे वेर्णन करताना समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात -
कलौ कीर्तन वरिष्ठ । जेथे होय ते सभाश्रेष्ठ ।।
नाना संदेह नष्ट । श्रवणे होय ।।
संतांच्या या शब्दप्रमाणांचा विचार केला तर कीर्तनाचे अगाध सामर्थ्य आपल्या सहज लक्षात येईल. तात्पर्य काय तर, विहित शास्त्रशुद्ध आचरण करून ईश्वराप्रत जाण्याचा सोपा मार्ग म्हणजेच कीर्तन भक्ती. वर्तमान काळात या कीर्तन परंपरेची नितांत गरज आहे. अपूर्णतेने ग्रासलेले, विसंगतीने माखलेले, संघर्षाने फाटलेले, द्वैताने दुभंगलेले, विनाशाने वेढलेले मानवी जीवन विशुद्ध व उन्नत व्हावे असे वाटत असेल तर, मानव हा महामानवात परिणत व्हावा असे वाटत असेल तर संतांचा हा राजमार्ग अवलंबावावाच लागेल, तरच पसायदानाचे सुस्वर ऐकू येतील.
- भरतबुवा रामदासी, राष्ट्रीय कीर्तनकार, बीड (मो.क्र. 8329878467 )