शिर्डीत साईसेवक बनण्यासाठी देशभरातून रीघ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 05:11 PM2018-05-26T17:11:19+5:302018-05-26T17:11:19+5:30

साईबाबांच्या देशभरातील भक्तांकडून शिर्डीतील साईसेवक योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Good Response to become SaiSevak for Shirdi Saibaba | शिर्डीत साईसेवक बनण्यासाठी देशभरातून रीघ

शिर्डीत साईसेवक बनण्यासाठी देशभरातून रीघ

googlenewsNext

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या वतीने श्री  साईबाबांच्‍या  समाधी शताब्‍दी  महोत्‍सवाच्‍यानिमित्ताने सुरु करण्‍यात आलेल्‍या  साईसेवक योजनेस उत्‍तम प्रतिसाद मिळत असून देशातील विविध राज्‍यातून साईभक्‍त या योजनेत सहभागी  होत आहे, अशी माहिती संस्थानाच्यावतीने देण्यात आली आहे.

श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी  महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने  संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या संकल्‍पनेतून श्री  साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक  मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या साईसेवक योजनेमध्‍ये साई  सेवकांचा २१ व्‍यक्‍तींचा ०१ गट तयार करण्यात येत असून मंगळवार ते सोमवार  ०१ गट काम करत आहे. असे एका आठवडयात सकाळी ०६.०० ते दुपारी ०२.०० व  दुपारी ०२.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत हे साईसेवक आठवडाभर सेवा देत हेत. या योजनेमध्‍ये महाराष्‍ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा,  कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्‍ली, ओरिसा, तामिळनाडू, मध्‍यप्रदेश, केरळ व  उत्‍तराखंड आदी राज्‍यामधुन ५२० साईसेवक गटांनी नोंदणी केलेली असून  आजतागायात ३६३ साईसेवक गटांच्‍या माध्‍यमातुन ७२६१ साईभक्‍तांनी साईसेवक योजनेतून सेवा दिलेली आहे. या योजनेत यापुढे १५७ साईसेवक गट  प्रतिक्षा यादीवर आहेत.

या साईसेवकांना मंदिर परिसर, संरक्षण विभाग, श्री साईप्रसादालय,  हॉस्पिटल, लाडु विभाग व निवासस्थाने याठिकाणी वर्षातून सलग ७ दिवस साईसेवेची संधी दिली जाते. हे साईसेवक सेवाभावीवृत्तीने भक्तांचा आदर  करुन, सन्मान करुन “ओम साई राम” म्हणून साईभक्तांच्या अडचणी सोडवत आहे.  या साईसेवकांना ओळखपत्र, गणवेश देवून त्यांची संस्‍थानच्‍या वतीने  निवास, भोजन, नाष्‍टा व चहापाण्‍याची व्‍यवस्‍था  मोफत करण्‍यात येत आहे.  दर मंगळवारी आलेल्‍या सेवेकऱ्यांचे स्‍वागत करण्‍यात येवून सेवा पूर्ण  झालेल्‍या सेवकऱ्यांचा संस्‍थानच्‍या वतीने प्रमाणपत्र देवून सन्‍मान केला जातो. तसेच या उपक्रमात सहभागी होणा-या साईसेवकांना स्‍वच्‍छता व  व्यसनमुक्तीची शपथही दिली जाते.

या साईसेवक योजनेत सहभागी होण्‍यासाठी संस्‍थानचे कामगार विभाग (०२४२३)  २५८८१०/११ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Web Title: Good Response to become SaiSevak for Shirdi Saibaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.