मानव धर्माची महान विभूती - तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 08:39 PM2019-12-20T20:39:38+5:302019-12-20T20:39:51+5:30

शिक्षणाचा प्रसार करणे, ही गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी १९५८ मध्ये बृहन्मठ होटगी शिक्षण संस्था स्थापन केली.

The Great Vibhuti of Human Religion - Taporatna Yogirajendra Shivacharya Mahaswamiji | मानव धर्माची महान विभूती - तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी

मानव धर्माची महान विभूती - तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी

googlenewsNext

तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे मूळचे कर्नाटकातील अंचेसगूर, ता. देवदुर्ग, जि. रायचूर येथील. माता गुळम्मा आणि पिता कुंडय्या यांच्या पोटी १९ एप्रिल १९३० रोजी पुत्ररत्न जन्माला आले. त्यांचे बालपणाचे नाव गुरुबसय्या होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंचेसगुर इथे झाले.  त्यानंतर त्यांना वैदिक शिक्षणासाठी आई-वडिलांनी श्री बृहन्मठ होटगी मठात आणून सोडले. सन १९५३ साली शिंगणापूरच्या शंभू महादेव भांडारगृहाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक झाल्यावर ‘योगीराजेंद्र’ हे नामविधान करण्यात आले.

३ फेब्रुवारी १९५६ साली चन्नवीर महास्वामीजी आजारी पडले व योगीराजेंद्र महास्वामीजींना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. ६ फेब्रुवारी १९५६ मध्ये चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी लिंगैक्य झाले. त्यानंतर लिं. चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या इच्छेनुसार योगीराजेंद्र शिवाचार्य यांचा बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. तेव्हापासून योगीराजेंद्र महास्वामी मठाचा कारभार पाहू लागले.  शिक्षणाचा प्रसार करणे, ही गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी १९५८ मध्ये बृहन्मठ होटगी शिक्षण संस्था स्थापन केली.  आजमितीस या शिक्षण संस्थेमार्फत होटगी, बोरामणी, धोत्री, लिंबीचिंचोळी, बोरेगाव, अरळी, सातनदुधनी, दर्गनहळ्ळी, विडी घरकूल, भवानी पेठ, एमआयडीसी इथे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, वसतिगृह, वाचनालय कार्यरत आहेत.  शाळेच्या कामासाठी स्वत:ची प्रिंटिंग प्रेस आहे.

शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच बोरामणी, सोलापूर, तुळजापूर, खानापूर, कुंभारी, तळवारगेरी येथील शाखा मठांचा जीर्णोद्धार महास्वामी यांनी केला. शाळेमधून शिकणाºया गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची प्रथा योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी सुरू केली. महास्वामीजी श्रावणमासात ४१ दिवस, धनुर्मासात ४१ दिवस तर नवरात्रात ९ दिवस अनुष्ठान आणि महापूजा ते करत असत. महास्वामीजी रोज दिवसातून तीन वेळा पूजा करीत. पूजा केल्याशिवाय पाण्याचा एक थेंबही ते ग्रहण करत नसत. अशाप्रकारे मठाचे कार्य जिवंत ठेवण्याचे काम महास्वामीजींनी अखेरच्या श्वासापर्यंत सुरू ठेवले. अशा या समाजोद्धारक महास्वामीजींच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
- संगप्पा कुं. म्हमाणे
प्राचार्य, एस.व्ही.सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एम.आय.डी.सी., सोलापूर

Web Title: The Great Vibhuti of Human Religion - Taporatna Yogirajendra Shivacharya Mahaswamiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.