महाराष्ट्री असावे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:59 AM2019-11-19T03:59:43+5:302019-11-19T04:00:09+5:30
प्रांताभिमान दूर ठेवून त्यांनी परराज्याचे कौतुक का करावं? हे औदार्य गुणाचं लक्षण आहे.
- बा. भो. शास्त्री
श्रीचक्रधरांनी महाराष्ट्रासाठी स्वतंत्र सूत्र मांडले आहे. त्यात महाराष्ट्राचं तोंडभरून कौतुक केलं तर खरं. गुजरात ही स्वामींची जन्मभूमी, तरीपण ते आपल्या साधकांना महाराष्ट्रातच राहायला सांगतात. खरंतर, गुजरात व महाराष्ट्रात तेव्हा बेबनाव होता. म्हणूनच विशाळदेव स्वामींना रामयात्रेला जाण्याची अनुमती देत नव्हते. तरी स्वामी महाराष्ट्रात आले व मराठीत नवीन दर्शनशास्त्र दिलं. महान राज्याचा सन्मान केला. प्रांताभिमान दूर ठेवून त्यांनी परराज्याचे कौतुक का करावं? हे औदार्य गुणाचं लक्षण आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
तुझे औदार्य जाणो स्वतंत्र
देता न म्हणसी पात्रापात्र
कैवल्या ऐसे पवित्र
वैरियाही दिधले
महाराष्ट्र राज्य हे उदार आहे. सर्व पंथ व धर्म येथे सुखाने नांदतात. आमची भाषा अमृतातेही पैजा जिंकणारी आहे. पसायदान हा विशाल हृदयाचा हुंकार आहे. क्षमाशीलता हा या मातीचा अंगभूत गुण आहे. स्वामींना अभिप्रेत असलेला भावच कवीवर्य गोविंदाग्रजांनी सांगितला. त्यांना महाराष्ट्रात देवत्वच दिसलं. ते म्हणतात,
मंगलदेशा! पवित्रदेशा! महाराष्ट्रदेशा!
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्रदेशा
राकटदेशा, कणखरदेशा, दगडांच्या देशा...
स्वामींना असेच शके १९९७ मध्ये या मंगल राष्ट्रात सर्वसमावेशकता जाणवली. जसा समुद्र सर्व नद्यांना स्वत:त सामावून घेतो, तसा हा महाराष्ट्र स्वामींना वाटला. ज्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्याच वर्षी बेलापूर येथे सूत्राचा जन्म झाला. १२ व्या शतकात स्वामी या महंत राष्ट्राचं तोंडभरून कौतुक करतात. हा त्यांचा प्रादेशिक अभिमान आहे असं नाही. यात इतर राज्यांची उपेक्षाही नाही.