लोभ हा आनंदाचा शत्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:10 AM2019-09-23T08:10:24+5:302019-09-23T08:11:26+5:30
ज्याचे मन पवित्र आहे तोच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्यांचे मन अपवित्र आहे तो सुख भोगू शकत नाही.
ज्याचे मन पवित्र आहे तोच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्यांचे मन अपवित्र आहे तो सुख भोगू शकत नाही. मनाची प्रसन्नता हीच सर्व सुखाची गुरूकिल्ली आहे. आपले कर्म चांगले असले की मन पवित्रतेत रमते अन् तेव्हा मनाचा आनंद मनालाच घेता येतो. स्वार्थी मानव या जगात आनंद भोगू शकत नाही. तो लोभयुक्त अंत:करणाने भरलेला असतो. लोभ हा मनुष्याच्या आनंदाचा शत्रू आहे. लोभी मनुष्य जास्त काळ सुखी राहू शकत नाही. पापाचा बाप लोभ आहे. लोभी माणूस नेहमी चिंताग्रस्त असतो. तो कष्टी होतो. लोभ हा तुम्हाला सर्वकाळ आनंदी ठेवू शकत नाही. लोभामुळे मनात मलिनता येते. त्यामुळे तो वासनेच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवतो.
लोभच मनुष्याच्या जीवनाचा अंत करू शकतो. लोभ पूर्ण झाला नाही की क्रोध येतो. क्रोध हा अत्यंत विनाशकारी व कष्टदायक आहे. क्रोधामुळे हिंसाचार वाढतो. क्रोध हा मनुष्याचा शत्रू आहे. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार होतो अन् पुन्हा तोच अग्नी त्या लाकडाला जाळतो तसा शरीरातूनच क्रोध उत्पन्न होतो व त्यालाच संपवतो. मनाची लय-गती बिगडवतो. मनाला शांत ठेवायचे असेल, प्रसन्न ठेवायचे असेल तर क्रोध व लोभ या दोन शत्रूंवर मात करावी. शांत मन क्रोध-लोभाला मारू शकते. क्लेशदायक क्रोध शांत मनाला त्रास देतो, परंतु मनाची प्रसन्नता कायम असेल तर क्रोधावर विजय मिळवता येतो. क्रोधावर विजय प्राप्त करा मग मन:शांती मिळेल. शांत मन प्रसन्न राहते. प्रसन्न मन सर्व सुखाची अनुभूती देते. मनाला सुखाची अनुभूती आली की मनात संदेह उत्पन्न होत नाही. अहंकार येत नाही. कठीण प्रसंगाला शांतपणे हाताळता येते. मनात सात्त्विक भाव निर्माण होतात. प्राणीमात्राबाबत दया उत्पन्न होते. मोह-मायात अडकत नाही. विकारवश मन दु:ख देते. तसे प्रसन्न मन विकारुपी शत्रूचे खंडन करते. कोणत्याही गोष्टीचा ते खेद करीत नाही. आत्मसुखाचा अनुभव घेते. विषयासक्त होत नाही.
लोभी, क्रोधी मनुष्य कधीच मनावर विजय मिळवू शकत नाही. प्रसन्न मन मोहात अडकत नाही. म्हणून म्हणतो, मन या सर्व गोष्टीला मुख्य कारण आहे. कारण पवित्र मन ठेवण्यासाठी कर्म शुध्द करावे लागेल. आपल्या कल्याणासाठी आपले मन पवित्र ठेवा. मन पवित्र झाले की सर्व देवता तुमच्या जवळच आहेत. मन शुध्द असले की आचरण शुध्द होते. आचरण शुध्द असले की कर्म चांगले घडते. चांगले कर्म घडले की, मनुष्य स्वत:चे कल्याण करून घेतो.
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)