Gudhi Padwa : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 09:45 AM2019-04-06T09:45:37+5:302019-04-06T09:46:48+5:30

गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो.

Gudhi Padwa : Why people celebrate festival of Gudipawda | Gudhi Padwa : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात?

Gudhi Padwa : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात?

googlenewsNext

गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला 'गुढीपाडवा' असे संबोधले जाते.

महाभारतातील गुढीपाडव्याचा उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.

महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते. कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. 

तसेच याच दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

गुढी शब्दाची उकल

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे. तसाच तो 'तोरण' असाही आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा.

आरोग्यदृष्ट्या गुढीपाडव्याचे महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदशास्रात मानले जाते.

Web Title: Gudhi Padwa : Why people celebrate festival of Gudipawda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.