अनुमान प्रमाणानें ईश्वर अस्तित्व..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 02:47 PM2020-02-08T14:47:37+5:302020-02-08T14:51:05+5:30
माणसाची बुद्धी ही चिकित्सक असल्याने दिसेल त्याचा कार्यकारण भाव शोधणारी आहे
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
ईश्वर हा अव्यक्त, निराकार, अतींद्रिय असल्यामुळे स्थूल इद्रिंयांना तो अगोचर आहे मग त्याचे अस्तित्व कसे सिद्ध करावयाचे.? उपनिषदकार असे म्हणतात -
न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् न मनः ।
तो डोळ्यांना दिसणार नाहीच.! नामदेव महाराज म्हणतात -
कसे बोटाने दाखवू तुला । घे अनुभव गुरुच्या मुला ॥
पण माणसाची बुद्धी ही चिकित्सक असल्याने दिसेल त्याचा कार्यकारण भाव शोधणारी आहे पण आपण ईश्वराचा शोध हा अनुमान प्रमाणानें करु शकतो. हे अफाट विश्व आपण बघतो. या विश्वात सूर्य, चंद्र, अनंत तारें, उल्का, समुद्र, वनस्पती, प्राणी, पर्वत आहेत. विश्वाचा हा अफाट पसारा बघितला म्हणजे तुम्हाला असे वाटत नाही का की हे सर्व कुणी निर्माण केले..? कारण या जगात निर्मात्याशिवाय एकही वस्तू निर्माण होऊच शकत नाही. जरी निर्माता आपल्याला दिसला नाही तरी तो आपण मानतोच ना..? शास्त्रकार सांगतात -
विश्वस्य गोप्ता भुवनस्य कर्ता ।
या विश्वाला कर्ता असलाच पाहिजे. निर्माण केलेले विश्व किती गणिती पद्धतीत बांधलेले आहे.
१) दिलेल्या वेळेलाच सूर्य उगवतो व मावळतो.
२) समुद्राची भरती ओहोटी बिनचूक वेळच्या वेळीच होते.
कुणाच्या आज्ञेने हे कार्य होते..? तर सज्जनहो.! हे सर्व कार्य त्याच ईश्वरीशक्तीने होते.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -
वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता ।
राहिली अहंता मग कोठे ॥
अहो..! इतकंच काय पण वारा त्याच्याच धाकाने वाहतो, सूर्य त्याच्याच भीतीने उष्णता देतो, इंद्र पाऊस पाडतो व अग्नी त्याच्याच भीतीने जाळण्याचे काम करतो.
श्रीमद्भागवतकार म्हणतात -
यद् भयाद् वाति वातोयं सूर्यस्तपति यद् भयाद् ।
वर्षतीन्द्रो दहत्यग्नि: मृत्यूश्चरति स पंचमः ॥
संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज सुंदर चिंतन मांडतात -
तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवां ॥
मजचि पासून आघवा । निर्वाह यांचा ॥
कल्लोळ माळा अनेगा । जन्म जळीची पैगा ॥
आणि तया जळचि आश्रय तरंगा । जीवनहि जळ ॥
ज्याप्रमाणे तरंगाची उत्पत्ती जळापासून होते त्याप्रमाणे विश्वाची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे.
तुकाराम महाराज अनुमान प्रमाणाने विचारतात हे माणसा.!
फुटे तरुवर उष्णकाळ मासी ।
जीवन तयासी कोण घाली ॥
कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती ।
वाढवी श्रीपती सवे दोन्ही ॥
हे कार्य ज्याअर्थी चालू आहे त्याअर्थी तो देव आहेच.
अनुमान प्रमाणाने सांगावयाचे झाल्यास -
अयं पर्वतो वन्हिमान् धूमत्वात् ।
या समोरच्या पर्वतावर अग्नी असलाच पाहिजे कारण त्या पर्वतावर धूर दिसत आहे. हा जो निष्कर्ष किंवा तर्क त्यालाच अनुमान असे म्हणतात. कार्यावरुन कारणाविषयीचा तर्क म्हणजेच अनुमान होय..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. ९४२१३४४९६० )