मन:शांती - नैतिक मर्यादांचे पालन.. आनंदाला उधाण..!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 09:27 PM2019-05-25T21:27:35+5:302019-05-25T21:28:31+5:30
मनावर संयम ठेवून नैतिक मूल्यांची जोड देऊन सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर जीवन सुखी व समृद्ध होते.
चौदा वर्षांच्या रमेशला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. वडिलांनी मोबार्इ$ल हिसकावून अभ्यास करावयास सांगितले, तर रागाच्या भरात रमेशने आत्महत्या केली. पुण्यात नुकत्याच घडलेल्याया घटनेवर खूप गंभीर विचारमंथनाची गरज आहे.
प्रतिभा ही कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतलेली विवाहित तरुणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यांसारख्या मुक्त वातावरणात वाढलेली. तिने हाफ स्लिव्हचा टी-शर्ट घातलेला, स्वत:चा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंट्स वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच चढला. तुफान भांडणे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ... आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे.
ऐश्वर्यसंपन्न कुटुंबातील प्रत्येकाला बंगल्यात स्वतंत्र खोली. टुमदार बंगला टोपेसाहेबांनी बांधला खरा, परंतु एकुलत्या एका मुलाला त्याच्या बेडरूममध्ये इंटरनेटवर तो काय पाहतोय, याकडे आई-बाबांचे दुर्लक्ष. विशाल नेटवर अश्लील साईट्स पाहता पाहता घरात पैशांची चोरी करीत वाममार्गाला लागला. विविध आजारही ओढवून घेतले. यातून खचल्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत.
नैराश्याने पछाडलेली मेधा ध्यानवर्गासाठी आली होती. दिवसभर पती आॅफिसला गेले, की घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. चॅटिंग करता करता तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा तिच्यात फार गुंतला, हे कळल्यावर मेधाच्या पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. मेधा आज नैराश्याने ग्रासली आहे. आत्महत्येचे विचार तिला सतावतात.
मोबाईल, इंटरनेट या खऱ्या गरजेच्या व उपयुक्त अशा गोष्टी. यामुळे ज्ञानवृद्धी, जवळीक, प्रसिद्धी, व्यवसायवृद्धी, वेळेची बचत, जलद संवाद, ओळखी यांसारख्या अनेक गोष्टी साधल्यामुळे जीवन सुखी व समृद्ध होते. मनावर संयम ठेवून नैतिक मूल्यांची जोड देऊन यांचा योग्य वापर केला तर तुम्हाला खूप मदत मिळते, पण मर्यादा न पाळता सीमारेषा ओलांडली तर मात्र आयुष्य कष्टमय व दु:खमय होण्याची दाट शक्यता असते.
बंगळुरू हे आयटी पार्क शहर. या शहरात मागील वर्षी इंटरनेट व मोबाईलच्या अति व असुरक्षित वापरामुळे ४,१९२ घटस्फोटांचे दावे न्यायालयात दाखल झाले आहेत. केरळमध्ये तज्ज्ञांच्या मते २५ टक्के घटस्फोटांचे दावे हे आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींचे आहेत. भारत हा फेसबुकच्या वापरात दुसºया क्रमांकावर असून १२५ कोटी लोक याचा वापर करीत आहेत.
प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आहेत. आज तरुण पिढीने नेटचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करताना मनावर बंधने घालून वेळेचे भान ठेवावे. चॅटिंग करताना सावधानता बाळगावी, पालकांनी आवश्यक त्या साईट्स ओपन ठेवून बाकी घातक अशा साईट्स ब्लॉक कराव्यात. मुले नेट वापरताना दूरून लक्ष ठेवावे.