आनंद हे परमेश्वराचं दुसरे स्वरूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 02:47 PM2019-10-26T14:47:01+5:302019-10-26T14:47:10+5:30

जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला ‘स्वत:च’ घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळतो, ओसंडत असतो. 

Happiness is another form of God! | आनंद हे परमेश्वराचं दुसरे स्वरूप!

आनंद हे परमेश्वराचं दुसरे स्वरूप!

Next

- आनंदाचा डोह आपल्यापाशीच असतो. इतरांसाठी काही करण्यातून आनंदाचे क्षण जिवंत करता येतात. त्या आनंदाला सीमा नसते. तो वर्णनातीत असतो. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. सतचितआनंद असं त्याचं वर्णन, म्हणजे अनुभव आहे. जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला ‘स्वत:च’ घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळतो, ओसंडत असतो. 
ठायीच बैसोनि करा एकचित्ते 
आवडी भगवंत आळवावा ॥
इकडे तिकडे भटकून समाधान, शांती कधीही लाभणार नाही. समर्थांचं मार्गदर्शन या दृष्टीनं मोलाचं आहे. ‘मनाचे श्लोक’मध्ये ते सांगतात-
बहु हिंडता सौख्य होणार नाहीे
शिणावे परी नातुडे हीत काही ॥
अर्थातच : सदासर्वत्र भटकण्यानं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी, व्रतवैकल्याचे संकल्प केल्यानं कुणाचंही हित होणार नाही. शीण मात्र येईल, पैसा-शक्ती-वेळ खर्च झाल्यानं एकप्रकारची क्षीणता, अशक्तता मनाला येईल. असलं दुबळं मन काय कामाचं? आजकाल लोक चारोधाम-अष्टविनायक-बारा ज्योर्तिलिंग-नर्मदा परिक्रमा अशा अनेक यात्रा करतात. खरं तर ती तीर्थयात्रा कमी नि पर्यटन (भ्रमण) अधिक असा प्रकार असतो. अशा यात्रींना अनुभवही तसाच येतो.
गंगेच्या पाण्यात डुबकी मारून तिला आपला एखादा विकार, वाईट सवय अर्पण करून स्वत: सुधारणं हा खरा उद्देश असतो. पण यासाठी शुद्ध मन, पवित्र भाव नि तीव्र इच्छाशक्ती हवी. त्यापेक्षा अंतरंगीची उपासना केली तर अंतयार्मीचा आनंदरूप परमेश्वर आतच भेटतो नि अपार आनंद आपल्या जीवनात-वर्तनात व्यक्त होऊ लागतो.

पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं आणि जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो!
 जसा, सुखी माणसाचा सदरा बाजारात विकत नाही मिळत. तो तर प्रत्येकाकडेच असतो, पण तो शोधावा लागतो. तसेच आनंदाचे आहे.  आनंद निर्माण करता येतो, पण तो निर्माण करणं म्हणजे उत्पादन नव्हे, ती वस्तू नाही. ती अमूर्त कल्पना आहे. ती जाणवते, अनुभवता येते, ती प्रकट होते, डोळ्यांतून उमटते, आणि चेहºयावर हसू फुलवते.
  ‘स्वत:साठी जगलास तर मेलास. इतरांसाठी मेलास तर जगलास.’ अर्थातच,  आपल्या स्वत:पलीकडेही एक जग असतं. तेच आपलं विश्व असतं. समाजात, आनंदाला पारखे झालेले अनेक दु:खी जीव भोवताली असतात. त्यांच्या जगण्याची स्वप्नं तुटलेली असतात. कधी समाजाकडून ती अव्हेरली जातात.
 पानगळीसारखा एकेक अवयव झडल्याचं दु:ख काहींच्या वाट्याला येतं. आज माणसं अधिकाधिक आत्मकेंद्रित बनत चालली आहेत. इतरांसाठी जगण्यातला आनंद त्यांना अनुभवता येत नाही. मात्र, प्राथनेसाठी जोडणाºया दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेल्या एका हाताने इतरांना मदत केली जाऊ शकते. इतरांच्या मदतीतून स्वत:च्या अंतरंगात आनंदाचा डोह निर्माण केल्या जाऊ शकतो. 

- शून्यानंद संस्कारभारती

Web Title: Happiness is another form of God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.