सुखकर प्राणायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:58 AM2018-11-20T00:58:16+5:302018-11-20T01:00:47+5:30

उन्हातान्हात फिरणारे, काबाडकष्ट करणारे, भ्रष्ट, असत्यभाषी, अनीतिमान हेही प्राणायामाला योग्य नाहीत. ७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते.

 Happiness Pranayama | सुखकर प्राणायाम

सुखकर प्राणायाम

Next

- डॉ. विजय जंगम (स्वामी)

उन्हातान्हात फिरणारे, काबाडकष्ट करणारे, भ्रष्ट, असत्यभाषी, अनीतिमान हेही प्राणायामाला योग्य नाहीत. ७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. या आयुर्काळात रक्ताभिसरण, रक्तपुरवठा निसर्गत: चालते. मात्र जन्मजात फुप्फुसदोषींनी (श्वसनात अडचण येईल म्हणून) प्राणायामाच्या वाटेला जाऊ नये.
प्राणायामाचा अभ्यास करणारे रागलोभविरहित, सदैव प्रसन्न असणारे, शरीर मनाने पावित्र्य जपणारे आणि प्राणायामाचा अभ्यास करायला उत्सुक असे हवेत. प्राणायाम शिकायला आरंभण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी पद्मासन, सिद्धासन अशी आसने अभ्यासावी. त्यांच्यामुळे शरीरातल्या नाड्या मृदू बनतात. ही आसनं दोनदोन वा तीनतीन तास एकाठायी स्थिर बसण्याची तयारी करतात. ती सिद्ध झाल्यावरच प्राणायामाभ्यास करायला घ्यावा.
प्राणायाम जिथे करायचा ती जागा शांत, पवित्र, शुद्ध वातावरण असलेली हवी. तिथे जोरदार झुळूक, वारा वेगाने वाहणे नसावे. यासाठीच उघड्या जागेत, माळावर कधीही प्राणायाम करू नये. जोरदार वायुवहनामुळे घाम वाळविला जातो, रंघ्रांबाहेर येत नाही. असं होणं अयोग्य आहे. घाम शरीराबाहेर यायलाच हवा. तसा तो येत नसेल तर नाडी शुद्ध नाही, हे नक्की. फुटणारा घाम नैसर्गिकपणे शरीरात मुरल्यास त्वचा मृदू कोमल बनते.
प्राणायाम दिवसातून दोनदा करावा. काही प्राचीन योगगं्रथात दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्री तो करावा असे लिहिले आहे. एका वेळी दहा प्राणायामांनी आरंभ करून नंतर दैनंदिन पाच आवृत्ती वाढ असा क्रम ठेवला तर सहा तासांत ३२० प्राणायाम संख्या होईल. पण इतका वेळ हल्ली असतो कोणाकडे? तेव्हा उपलब्ध वेळ, शरीरावस्था, आरोग्य यांचा मेळ घालून मगच अभ्यासाची मर्यादा ठरवावी. सर्वदा अनुभवी योगाभ्यासीकडून मार्गदर्शन घेत राहावे.
दोन वेळा प्राणायाम करणाऱ्यांनीही सायंकाळी शरीर थकले असता, दिवसभरात अति कष्ट झाले असल्यास रात्रीचा अभ्यास आटोक्यात करावा. अन्यथा फुप्फुसांमध्ये बिघाड होऊन त्रास होऊ शकतो. अजीर्ण असणाºयांनीही हीच काळजी घ्यावी. जेवणापूर्वी ३-४ तासांपूर्वी प्राणायाम करू नये. आहार हलका असावा. जड पदार्थ टाळावे. तापटपणा वाढविणारे, आळस आणणारे अन्न सेवू नये. सात्त्विक आहार म्हणजे वरण-भाकरी, मुगाची खिचडी, पालेभाज्या, दूध, तूप, फळफळावळे, सुकामेवा असे पदार्थ भोजनात ठेवावे.
सिद्धासन, स्वस्तिकासन, सुखासन अशी आसनं प्राणायामाला साहाय्यकारी म्हणून श्रेष्ठ समजली गेली आहेत. अर्थात त्यात प्रावीण्य तर हवे! बैठकीचे आसन गुळगुळीत आणि मऊ असावे. प्राणायाम करताना पाठ, मान ताठ ठेवावी, वाकून बसू नये. अंग ढिल्लम ढिल, वेडेवाकडे ठेवून बसू नये. जरी वसंत ऋतू आणि शीतकल हे जरी प्राणायामाला सुखकर असले तरी नियमित अभ्यासकास सर्व ऋतू सारखेच! प्राणायामास स्वर अनुकूल असणेही महत्त्वाचे आहे. चंद्रस्वरावर प्राणायाम करावा हे श्रेयस्कर आहे.
प्राणायाम अभ्यासात बंध साधण्याने लाभ वाढतो. मात्र योग्य मार्गदर्शनानंतरच असे बंध स्वतंत्रपणे करावे. कुंडलिनी जागृती करताना या महाशक्तीशी पुरेशा नम्रतेनं वागावं नपेक्षा तिचे दुष्परिणाम सहन करावे लागतील.

Web Title:  Happiness Pranayama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.