आनंद तरंग - शोधक वृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:03 AM2019-06-12T07:03:25+5:302019-06-12T07:03:55+5:30
जेव्हा इच्छापूर्ती होईल तेव्हा काय मिळणार आहे हे तुम्हाला आधीपासूनच ठाऊक असते.
सद्गुरू जग्गी वासुदेव
आपण जेव्हा आत्मज्ञानाबद्दल बोलत असतो, तेव्हा शोधक वृत्ती आणि इच्छा यामधील फरक कळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टींचीच तुम्ही इच्छा करू शकता. ज्याबद्दल तुम्हाला काही माहितीच नाही, त्या गोष्टीची तुम्ही इच्छा करूच शकत नाही; तुमची इच्छित गोष्ट जरी सध्या तुमच्याकडे नसली, तरी त्याची माहिती तुम्हाला असते. परंतु आपण जेव्हा ‘शोधक वृत्ती’ म्हणतो, तेव्हा या संदर्भात नेहमीच ‘मला माहीत नाही’ असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणूनच तुम्हाला ते जाणून घेण्याची ओढ लागते. ही ओढ निरागसतेतून येते. तुम्हाला तुमच्या रितेपणातून बाहेर यायचे असते... त्यातून ती येते.
जेव्हा इच्छापूर्ती होईल तेव्हा काय मिळणार आहे हे तुम्हाला आधीपासूनच ठाऊक असते. आधीच मनात ध्येय तयार असते आणि मग तुम्ही त्याकडे वाटचाल करता. पण जेव्हा काही जाणून घ्यायची ओढ लागते तेव्हा तुमच्या मनात कसलेही चित्र आधीपासून तयार नसते. तुम्हाला त्याबद्दल काहीच कल्पना नसते. तुम्ही फक्त शोधत असता. हा फार मोठा फरक आहे. जर तुम्ही एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करत असाल, तर तुम्ही स्वनिर्मित गोष्टीकडे जात असता. पण जेव्हा तुम्ही शोध घेत असता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नसते. चालू असतो तो फक्त शोध. तुमच्या शोधातून आपल्या हाती नेमके काय गवसेल हे आपल्याला ठाऊक नसते. मात्र तुम्ही जर इच्छा निर्माण केली, तर ते काय असेल याचा सुगावा तुम्हाला आधीच लागलेला असतो. आत्मज्ञानाच्या बाबतीत कोणतेही निष्कर्ष उपयोगी पडत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाच्या संदर्भात फक्त ओढ... म्हणजे शोधक वृत्ती बाणली जाऊ शकते. त्या शोधक वृत्तीच्या साहाय्याने तुम्ही आत्मज्ञान सहज आणि सुलभपणे अवगत करू शकता. म्हणूनच शोधक वृत्तीचे महत्त्व नक्कीच ध्यानात घेण्यासारखे आहे, हे निश्चित.