आनंद तरंग: स्पंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 04:13 AM2019-05-01T04:13:00+5:302019-05-01T04:13:20+5:30
मनुष्याचे जीवन अनेकानेक परिस्थितीचे भलेमोठे जाळे बनले आहे. एका समस्येतून बाहेर पडतो न पडतो तोच दुसरी परिस्थिती सामोरी उभी राहते.
ब्रह्मकुमारी
मनुष्याचे जीवन अनेकानेक परिस्थितीचे भलेमोठे जाळे बनले आहे. एका समस्येतून बाहेर पडतो न पडतो तोच दुसरी परिस्थिती सामोरी उभी राहते. त्या परिस्थितीमधलाच एक भाग आहे ‘संबंध’. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. अनेकानेक संबंधांमध्ये गुरफटलेला. हे जाळे जितके विस्तारावे तितके कमीच. काही वर्षांपूर्वीचा काळ थोडा वेगळा होता. आज शैक्षणिक स्तर वाढत असला तरी मनाची नाती खूप दुरावलेली दिसून येतात. एका छताखाली आज पती-पत्नींना एकत्र राहणेसुद्धा मुश्कील. हा बदल का? शरीराची प्रकृती जशी खालावत चालली आहे तसेच मनही कमजोर होत आहे. आत्म्यामध्ये असलेले गुण व शक्ती यांचा ऱ्हास होत चालला आहे. सहन करणे, समजून घेणे, सामावून घेणे यांची कमी आज जाणवून येते. व्यक्ती पहिले आपल्या संबंधांना महत्त्व द्यायचा, त्यासाठी काहीही करण्याची मनामध्ये ताकद असायची, पण आज भौतिक वस्तू, पद, धन यांचे महत्त्व वाढत चालले आहे. थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो की, खूप प्रयत्न करून जेव्हा बल्ब तयार होतो व तो परीक्षणासाठी नेणाऱ्या व्यक्तीच्या हातून काही कारणाने फुटला. त्या वेळी एडिसन यांनी कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देता त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या वेळी पुन्हा जेव्हा तो बल्ब परीक्षणासाठी घेऊन जायचा होता तेव्हा त्यांच्या आसपास असणाऱ्यांनी विशेष त्या व्यक्तीच्या हातात न देण्याचा सल्ला एडिसन यांना दिला. तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले की, ‘बल्ब तुटला फुटला तरी मला चालेल, पण त्यांचे मन तुटलेले मला चालणार नाही.’ सांगण्याचे तात्पर्य हे की, संबंधांमध्ये विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे.