आनंद तरंग - अतुलनीय संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:10 AM2019-01-11T08:10:43+5:302019-01-11T08:11:51+5:30
भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि बहुरंगी आहे. ती किचकट आणि अस्ताव्यस्त वाटत असली, तरी ती तितकीच खूप सुंदर आहे.
सद्गुरू जग्गी वासुदेव
भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि बहुरंगी आहे. ती किचकट आणि अस्ताव्यस्त वाटत असली, तरी ती तितकीच खूप सुंदर आहे. आणि ती काही तुम्ही एका रात्रीत उभारू शकणार नाही. अशी वैविध्यपूर्ण संस्कृती निर्माण करायला हजारो वर्षे लागली आहेत. या संस्कृतीत कुठल्याच गोष्टीचे स्वागत करायला आपण कचरलो नाही. सर्व प्रकारचे देव, सर्व प्रकारच्या धारणा, श्रद्धा आणि जगातील एकूणएक तत्त्वज्ञानांचा आपण स्वीकार केला आहे, कारण या संस्कृतीत आध्यात्मिक ज्ञान अतिशय खोलवर आणि परिपूर्णरीत्या अभ्यासले गेले आहे. जगात इतर कोणत्याच ठिकाणी असं घडलं नाही. एक आत्मज्ञानी व्यक्ती कशी निर्माण करायची, हे आपल्याला अवगत आहे.
आपल्याला हे माहीत आहे, की एका व्यक्तीबरोबर जर आपण अमुक एक ठरावीक गोष्ट केली, की ती व्यक्ती त्यानुसार आकार घेईल. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीने अंतर्ज्ञानाकडे इतक्या खोलवर आणि समजुतीने पाहिलेले नाही, जितके या संस्कृतीने पाहिले आहे. दुर्दैवाने, आज बहुतांश लोक ही संस्कृती अगदी वरकरणी अनुभवतात. परंतु जर तुम्ही या संस्कृतीकडे लक्षपूर्वक पाहिले, तर तुम्हाला समजेल, जीवनाचा प्रत्येक पैलू अतिशय बारकाईने अभ्यासला गेला आहे, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने समजून घेऊन निर्माण केला आहे. भारतीय जीवनशैलीत, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करत असलेली प्रत्येक सहज, सोपी कार्य-कृती, ही खरंतर तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. कसे बसावे, कसे उभे राहावे, कसे जेवावे, अभ्यास कसा करावा अशा प्रत्येक कृतीसाठी एक आसन आणि एक मुद्रा आणि एक विशिष्ट प्रकारची मन:स्थिती सुचिवली आहे, जेणेकरून तुम्ही जाणिवेचे उच्च शिखर गाठू शकता. उदाहरणार्थ, संगीत आणि नृत्य हे काही मनोरंजन नाही, या देशात त्या एक आध्यात्मिक प्रक्रिया आहेत. जर तुम्ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहिलेत, जर तुम्ही ते योग्य प्रकारे आत्मसात केलेत आणि त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलेत, तर तुम्ही ऋ षीं-मुनींसारखे बनाल; ती तुमचा आत्मबोध घडवून आणतील. जे संगीतकार आपल्या संगीतात तल्लीन होतात, ते साहजिकच चिंतनशील बनतात, कारण आपल्या संस्कृतीची रचनाच त्या प्रकारे केली गेली आहे. म्हणून, केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी या संस्कृतीची जपणूक करणे, तिचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.