आनंद तरंग - भगवंताचे खरे रूप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:05 AM2018-12-20T07:05:51+5:302018-12-20T07:07:09+5:30
भगवंत म्हणजे कृष्ण आणि कृष्ण म्हणजे भगवंत अशी धारणा होत राहते, पण
विजयराज बोधनकर
आध्यात्म एक मोठे गुपित आहे, रहस्य आहे. त्या रहस्याचा उलगडा अनेकांना न झाल्यामुळे आध्यात्मातल्या भगवंत विषयीची जाणीव पूर्णत्वाला बऱ्याच प्रमाणात जाऊ शकली नाही. ज्यांना-ज्यांना भगवंत नेमका कोण, कुठे व कसा असतो, याची जाणीव झाली, त्यांच्या आयुष्यात मोठी क्रांती झाली आहे. भगवद्गीतेत पानोपानी भगवंताचा उल्लेख होतो. भगवंत म्हणजे कृष्ण आणि कृष्ण म्हणजे भगवंत अशी धारणा होत राहते, पण कृष्ण हा मानव स्वरूपातून चित्र शिल्पातून जगापुढे मांडण्यात आला आहे. त्याला मानवी आकार दिल्यामुळे त्याचे अस्तित्व धरतीवर होते, याला पुष्टी मिळते, परंतु कृष्ण जेव्हा म्हणतो की, मी चराचरात वास करतो. सर्वत्र मीच भरला आहे, तेव्हा मात्र एक प्रश्न निर्माण होतो की, एक मानवासारखा दिसणारा मानव चराचरात कसे व्यापू शकतो? तेव्हा त्याला उत्तर म्हणजे, कृष्णाचे अतिविराट रूप असणारे चित्र! एक मानव इतके विराट रूप घेऊन पुन्हा सूक्ष्म कसा होऊ शकतो, तर याचे उत्तर चिंतनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळू शकते. या विराट रूपातल्या चित्राचे आपण बारकाईने अवलोकन केले, तर असे लक्षात येईल की, त्यात शंकर आहे, विष्णू आहे, हनुमान, गणेश, नृसिंह, गरूड, ऋषिमुनी आणि पंचमहाभूते म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या मानवी रूपातून दाखविल्या आहेत. यावरूनच हे सिद्ध होते की, विष्णू म्हणजे विचार, हनुमान म्हणजे अनुमानाची शक्ती, शंकर म्हणजे सृष्टी, गणेश म्हणजे बुद्धी अशा अनेक प्रतिमांनी हे विराट रूप साकारलेले आहे. त्याचमुळे भगवद्गीतेमधील भगवंत हा ब्रह्मांडत्व आणि पंचमहाभूतांचे प्रतीक आहे.