सुखदु:ख नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:25 AM2020-01-31T00:25:17+5:302020-01-31T00:25:24+5:30
ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो.
- बा.भो. शास्त्री
सुखदु:खाचा दाता कोण आहे? याचं उत्तर आपणच आहोत. चविष्ट भाजी बाईने केली. सुख तयार झालं, बेचव झाली तर, दु:ख. दोन्ही आपल्या हातातच आहे. एक ज्ञानात, एक अज्ञानात आहे. बरंवाईट आपल्याच हातात आहे. दोन्हीही कर्मजन्य आहेत. दु:खाला कारण अज्ञान आहे, आणि सुखाला कारण ज्ञान आहे. ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो. अज्ञानी बेसावध असतो. भावनेच्या भरात चटकन कुणाला चंद्रमुखी उपमा देतो. जेव्हा त्याला सौंदर्याखाली अग्नी असल्याचं लक्षात येतं. तेव्हा तोच त्याला ज्वालामुखीची उपमा देतो. ज्ञानी अचूक निर्णय घेतो. ज्ञान पवित्र व अज्ञान अपवित्र आहे. जीवनात आपण अन्न, वस्त्र, निवारा यांचं नियोजन करीत असतो, तसं सुखाचं करता येणार नाही? करता येतं. नराचा नारायण होता येतं. इतिहासात लहान माणसं मोठी झाली. दुष्ट झाली. मूर्ख विद्वान झाले, आपण पाहातोच. जाणते जेवणाचाच विचार करीत नाहीत, तर त्यांच्यात जीवनाचाही विवेक असतो. भविष्यात काय व्हायचं हे ते ठरवतात व होतात. मेल्यावर लोकांनी काय म्हणून आपली आठवण करावी हे त्यांनी निश्चित केलेलं असतं. पुण्यतिथी, जयंती हे तेच आहे. ती योग्यता त्यांनी स्वत:त निर्माण केली. काही दु:खाचे डोंगर उभारतात. विवेकी चहात बिस्किट बुडवतो, चटकन काढतो. सुखाने खातो. अविवेकीही बुडवतो, पण काढायला वेळ लावतो. बिस्किट कपाच्या तळाशी गाळ होऊन बसतं. दु:ख जन्माला येतं. किती वेळ ठेवायचं कळत नाही. सुख व दु:ख एकाच कपात तयार होतात. कपाचा दोष नाही. सुखदु:खाचं नियोजन आपल्या ज्ञानावरच आहे. सामान्य माणसाला आपण किती प्रदूषण निर्माण करतो कळत नाही. शब्दापेक्षा चित्र प्रभावी असतं. एका पुस्तकाचा आशय त्यात असतो. म्हणून गायछाप तंबाखूच्या पुडीवर विंचवाचं चित्र असतं, तरीही लोक खातात.