आनंद तरंग: दुष्टांचा संहार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 04:00 AM2019-04-30T04:00:29+5:302019-04-30T04:00:47+5:30
एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे.
बा.भो. शास्त्री
एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे. अंगलट येणारी दया पृथ्वीराज चौहान या पराक्रमी राजाला भोवली. फसवा घोरी जिंकला. क्षमा हरली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘दया तिचे नाव धर्माचे पालन
आणिक निर्दालन कंटकाचे’’
किती सुंदर अभंग आहे हा. धर्माचे पालन दयाच करते व दुष्टांचा संहार हेही दयेतच येतं. अभ्यासासाठी मुलांना निवेदन देऊन काय उपयोग? त्यांच्यावर रागावणं गरजेचं आहे. बेसुमार मोबाइलचा वापर करणारी मुलं आणि मुली अनिष्टाच्या भोवऱ्यात सापडत असतील तर त्याला आपणच जबाबदार असतो. यांचं भान आपल्याला असावं लागतं. तेव्हा त्यांना समज द्या. काही ऐकतील, काही ऐकणार नाहीत. न ऐकणारे तुम्हाला सोडायला तयार आहेत, मोबाइल नाही. संसार सोडणाऱ्या संन्याशाच्या कानाला तो चिकटला आहे. कसं करणार? तो कसा वापरायचा तुम्ही सांगालही. पण तसं करीलच याचा भरोसाच नाही. रेडिओ कानातून घुसला. हा डोळ्यातून शिरला. चांगलं माहितीचं प्रलोभन दाखवून. हा वाईट जास्त शिकवतो. त्यात धर्म आहे. अधर्म आहे. कीर्तन आहे. नर्तन आहे. राम आहे. काम आहे. अशा चक्रव्यूहात अभिमन्यू व सभेत द्रौपदी आहे. मोबाइलला दया येत नाही. चांगलं स्वीकारणाऱ्यांची संख्या कमी तर वाईट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आम्ही पांडवांसारख्या माना खाली घालतो. त्यांना वाचवण्यासाठी हुशारीने इष्टकारक अनिष्ट करायला काय हरकत आहे?