‘गीता’ ही धर्मज्ञानाचा कोष; गीता जयंतीला पाच हजार वर्षांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:35 PM2018-12-19T16:35:34+5:302018-12-19T16:36:11+5:30
खामगाव : प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचे मान मिळाला आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले असून, जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत आहे.
खामगाव : प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचे मान मिळाला आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले असून, जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष असून, मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने अजुर्नाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो.
गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अजुर्नाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन प्रयास केला आहे. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंत:करणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता दिसून येते, गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. 'गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते.
भगवत गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. गीता जयंतीला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे.
- प.पू. शंकरजी महाराज, मठाधिपती, जागृती- तपोवन पीठ, खामागव.