Holi Special : काय आहे होळी सणाचं महत्त्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 09:29 AM2019-03-20T09:29:12+5:302019-03-20T09:31:56+5:30

रंगांचा सण म्हणून होळीचा सण ओळखला जातो. मार्च महिना सुरू झाला की, सर्वांना या सणाची उत्सुकता लागलेली असते. होळी-रंचपंचमी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण.

Holi Special: What is the significance of Holi festival? | Holi Special : काय आहे होळी सणाचं महत्त्व?

Holi Special : काय आहे होळी सणाचं महत्त्व?

googlenewsNext

रंगांचा सण म्हणून होळीचा सण ओळखला जातो. मार्च महिना सुरू झाला की, सर्वांना या सणाची उत्सुकता लागलेली असते. होळी-रंचपंचमी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण. होळीचा हा रंगमय सण देशभरात साजरा केला जातो. विशेषकरून उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा हा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो. चला जाणून घेऊया या सणाचे महत्व.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला 'होलिकादहन' किंवा 'होळी', 'शिमगा', 'हुताशनी महोत्सव', 'दोलायात्रा', 'कामदहन' अशी वेगवेगळी नावं आहेत. ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे पूजा करून जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. 

होळीचे महत्त्व

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

आख्यायिका

लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

तज्ज्ञांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.

Web Title: Holi Special: What is the significance of Holi festival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.