श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:49 AM2018-10-08T03:49:22+5:302018-10-08T03:49:38+5:30

गीतेच्या सहवासात आपण जर का राहिलो, तर आपला निश्चितपणे उद्धार होतो. प्रस्थान-त्रयीमध्ये गीतेला स्थान आहे. एवढे गीतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

From the holy mouth of Shrikrishna, the Gita like Gangoda was pleased ... | श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली...

श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली...

Next

- वामन देशपांडे

भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली, ती कुरुक्षेत्रावर, प्रत्यक्ष युद्धभूमीवर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे निमित्त करून विश्वातल्या मानवी समूहाला जो उपदेश केला, ती ही श्रीमद्भगवतगीता ज्याला आपल्या जगणार असलेल्या एकूणच आयुष्याचे कल्याण व्हावे असे वाटते, त्या माणसाने गूढरम्य अशा या गीतेच्या अखंड सहवासात राहावे. गीतेच्या सहवासात आपण जर का राहिलो, तर आपला निश्चितपणे उद्धार होतो. प्रस्थान-त्रयीमध्ये गीतेला स्थान आहे. एवढे गीतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपले हित साधायचे असेल, तर गीतेला पर्याय नाही, हे जाणून घेणे मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. परमात्म्याची प्राप्ती करून देणारी गीता, मानवी मनाला परमशांतीचा साक्षात अनुभव देते. एक लक्षात घ्या की, गीतेत गुठल्याही मतप्रणालीविषयी आग्रही भूमिका नाही. फक्त गीतेने एकच आग्रह केला आहे. तो म्हणजे, प्रत्येकाने आपले कल्याण करून घ्यावे. गीतेमध्ये तर कुठल्याही स्वरूपाचे मतभेद नाहीत. या मर्त्य विश्वात एक परमात्मा सत्य आहे, त्याचे अप्रतिम दर्शन फक्त गीताच घडवते. गीता हा एक अद्भुत ग्रंथ आहे. त्यात प्रकट झालेले तत्त्वज्ञान हे वेदान्ताचे सार आहे. गीता श्लोकांचा खोलवर जाऊन जर नित्य वेध घेतला, तर एक गोष्ट आपल्या त्वरित लक्षात येते की, गीतेतले तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तिपाटावर स्थिर आसनमांडी घालून बसावे लागते. त्या संदर्भात, ज्ञानदेव श्रोत्यांना प्रेमाने सांगतात,
अहो अर्जुनाचिये पांनी । जे परिसणया योग्य होती।
तिही कृपा करूनि संती । अवधान यावे ।।
श्रोतहो, तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगतो की, मन एकाग्र करून, या गीतेमधल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थानुकूल वेध घेत, मोक्षप्राप्तीचा आनंद प्रत्यक्ष उपभोगावा. त्यासाठी प्रथम एक गोष्ट निष्ठापूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे भक्तश्रेष्ठ अर्जुन ज्या श्रेष्ठ भगवंत भावनेने ज्या भक्तिपाटावर बसला होता ना, त्याच पंक्तीत बसून गीताश्रवण करावे. श्रोतेहो, कृष्णार्जुन संवाद अलौकिक होता. प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी कृष्णमुखातून गीता प्रगट झाली होती. या गीतेचा अत्यंत श्रद्धेय आणि उत्कट भावस्थितीत वेध घेणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या की, गीतेमधील श्रीकृष्णार्जुन संवादाचा आपण निशब्द अवस्थेत वेध घेत, पुन्हा आपल्याशीच संवाद साधावा.

Web Title: From the holy mouth of Shrikrishna, the Gita like Gangoda was pleased ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.