उत्तिष्ठत, जाग्रत..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:31 AM2019-01-15T06:31:06+5:302019-01-15T06:31:15+5:30
स्वामी विवेकानंदांना त्रिवार नमस्कार.
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत
कठोपनिषदातील हे सूत्रवाक्य. स्वामी विवेकानंदांच्या उपदेशातील एक वचन. उठा..जागे व्हा..जाणकार, श्रेष्ठ अशा माणसाच्या सान्निध्यात राहून ज्ञान प्राप्त करून घ्या. विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा...म्हणजे काय?...आम्ही कुठे झोपलो आहोत?..हो..ही खरोखर निद्रा आहे, अज्ञानाची निद्रा, चुकीच्या रूढींना कवटाळून बसण्याची निद्रा, काहीही काम, कर्म न करता आळसात वेळ घालवण्याची निद्रा... या निद्रेतून उठा... ही निद्रा सोडा... खडबडून जागे व्हा आणि योग्य मार्गाने कर्मप्रवृत्त व्हा...आपल्या आयुष्याचे ध्येय ओळखा.
१२ जानेवारी... स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस...! सातासमुद्रापार विदेशात जाऊन, शिकागो येथे सर्वधर्म परिषदेत जाऊन प्राचीन हिंदू धर्माचा संदेश पोहोचवणारे पहिले हिंदू धर्मप्रचारक..! अमेरिका, इंग्लंडमध्ये वेदांत सोसायटी स्थापली. स्वामीजी मातृभूमीचे उत्कट भक्त, सुधारणावादी आणि प्रभावी संघटक होते. परकीय सत्तेच्या तडाख्याने खचून गेलेल्या, स्वत्वाचे तेज विसरून गेलेल्या हिंदू बांधवांना त्यांनी संघटित केले. त्यांना गती, दिशा दिली. उद्घोष केला तो शक्तीच्या, सामर्थ्याच्या उपासनेचा... शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा..! रामकृष्ण परमहंसांचे हे अद्वितीय शिष्य. कलकत्त्याजवळ वराहनगर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली. अद्वैत विचार जगभर पसरवला. आदि शंकराचार्य यांचे अद्वैत तत्त्वज्ञान, वेदांतातून हे विचार सर्वांपर्यंत नेले.
१) यत्र जीव, तत्र शिव..जिथे जीव, तिथे शिव, त्यामुळे जीवाची सेवा, हीच शिवाची, ईश्वराची सेवा.
२) प्रत्येकात ईश्वर आहे.
३) अंतर्मनावर आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून दैवी अंशास जागे करा.
४) भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग यापैकी कुठल्याही मार्गाने तुम्हाला इच्छित ध्येयापर्यंत जाता येते.
५) मोहनिद्रेतून जागे व्हा, स्वत:ला दुबळे समजू नका.
६) शारीरिक दुर्बलेचा त्याग करा. व्यायाम करून सामर्थ्यवान बना.
७) संघटित व्हा.
स्वामी विवेकानंदांना त्रिवार नमस्कार. भुवन मंडले, नवयुगमुदयतु, सदा विवेकानंदमयं, सुविवेकमयं, स्वानंदमयं. भुवन मंडळात म्हणजे विश्वात नवयुगाचा उदय होवो, जे युग सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, अर्थात सुविवेकाने आणि स्वानंदाने परिपूर्ण असेल...
-शैलजा शेवडे