अध्यात्मिक विचारांनी वाईट विचारांचा नाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:45 AM2018-10-22T08:45:08+5:302018-10-22T09:03:15+5:30
मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे.
- तुळशीराम गुट्टे महाराज
मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. अध्यामिक विचारांचे चिंतन केल्याने वाईट विचारांचा आकार बदलत जातो. माणसांच्या मानसिक व भावनात्मक गोष्टींमुळे मनात परिवर्तन होते. आपणच आपल्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. सकारात्मकता आपल्या जीवनात संतुलन निर्माण करते. मनाला प्रलोभनाकडे भटकू देत नाही. आपल्या मनाचे लक्ष ईशतत्त्वाकडे किंवा कोणत्यातरी दिव्यत्वाचे चिंतन करण्याकडे धावले पाहिजे. मग आपले मन वाईट विचारांना प्रतिबंध करते. आपल्याला मोहात पाडणाऱ्या विषयाला दूर सारून मग ईश्वराकडे ते मन बोलते. मनाला मोहित करणाऱ्या विषयांप्रति घृणा व किळस निर्माण होते. म्हणून साधकांनी किंवा सात्त्विक वृत्तीच्या माणसांनी ध्यानाचा अभ्यास करावा. कारण ध्यानाने मनात सात्त्विकता निर्माण होते. आत्मिक ऊर्जास्पंदने निर्माण होतात. त्यातून वाईट विचारांवर मात होते. मनाची चाललेली ओढाताण थांबते. साधकांनी मनाला आवर घालावा. यासाठी योग-ध्यान या मार्गाचा अवलंब करावा. कारण मनामध्ये चाललेल्या प्रचंड गोंधळाला शांत करावे. यासाठी महत्त्वाचा उपाय ध्यानधारणा सांगितला आहे.
मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार ज्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होतो, तिचाच मनावरही होतो. कारण शरीरापेक्षा मनावर होणारा परिणाम अधिकपटीने जास्त होतो. आजकाल चिडचिड करणारे माणसं जास्त दिसून येतात. कारण सर्वत्र अशांतता, द्वेष, मत्सर जाणवतो. ही लक्षणे दुर्बल मनाची आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते, मनाला सुदृढ स्थितीत ठेवायचे असेल तर ध्यान साधना करा. ध्यानाने मग परिपक्व होते. सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. सकारात्मकता निर्माण झाली की नकारात्मकता नष्ट होते. मग वाईट विचार नष्ट होतात. मन सुदृढ होते. मग शारीरिक, मानसिक धोका उद्भवू शकत नाही. मग आपल्याच मनावर आपले नियंत्रण राहाते.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे अध्यक्ष आहेत.)