प्रार्थिल्यावाचोनि आलासी का...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:20 PM2018-10-17T17:20:28+5:302018-10-17T17:20:57+5:30

सदगुरूला मोठे म्हणावे की देवाला मोठे म्हणावे ?

How to get a request? | प्रार्थिल्यावाचोनि आलासी का...

प्रार्थिल्यावाचोनि आलासी का...

googlenewsNext

सदगुरूला मोठे म्हणावे की देवाला मोठे म्हणावे ? हा महत्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर संतच देतात. जगदगुरू तुकाराम महाराज म्हणतात, देव सारावे परते । संत पूजावे आरते ।। देवापेक्षा संत, सदगुरू मोठे असतात. गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय। बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।। संत कबीर फारच छान सांगतात, गुरु आणि गोविंद (देव) दोन्ही समोरच उभे आहेत.  अगोदर कोणाच्या पाया पडू?  अशा स्थितीत मी गुरूच्या पाया पडणे पसंत करीन. कारण श्रीगुरूंनीच मला भगवंताचे दर्शन घडविले आहे. देवाने नाही. गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष। गुरू बिन लखै न सत्य को, गुरू बिन मिटै न दोष।। कबीर महाराज म्हणतात की गुरूशिवाय ज्ञान होत नाही, श्रीगुरुशिवाय अज्ञान जात नाही व व ज्ञान प्राप्त होत नाही. मोक्ष त्यांच्याशिवाय मिळू शकत नाही. सत्य-असत्यामधील फरक कळत नाही म्हणून देवापेक्षा गुरु निश्चित श्रेष्ठ आहेत. तस्मै श्री गुरुवे नम:
सदगुरू आणि देव यांच्यामध्ये एक फार मजेशीर फरक आहे.  देव मनुष्याला वैकुंठ, कैलास, स्वर्ग असे वेगवेगळे लोक देऊ शकतो. पण तो आत्मज्ञान, मोक्ष, मुक्ती देऊ शकत नाही. कारण आत्मज्ञान, मोक्ष, मुक्ती  हे देण्याचा अधिकार फक्त सद्गुरूलाच आहे. समजा देवाला वाटले की माझ्या या भक्ताला ज्ञान द्यावे तर त्याला देव या रूपात ते देता येत नाही. त्यासाठी त्याला त्या भक्ताचा सद्गुरू व्हावे लागते. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ।। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा किती सुदंर प्रेमभाव आहे. तो स्वत:च माझा गुरु झाला आहे. भागवत गीतेमध्ये जोपर्यंत अर्जुन देवा मी तुझा शिष्य आहे, असे म्हणत नव्हता तोपर्यंत भगवंत त्याला ज्ञान सांगतच नव्हते. पण जेव्हा अर्जुन म्हणाला कार्पण्य दोषोपहत स्वभाव: पृच्छामि त्वां धर्मसंमूढ चेता:। यच्छ्रेय: स्यानिनश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम।।२-७।। तात्पर्य जेव्हा अर्जुनाने आपल्या अज्ञानाची, दोषांची कबुली दिली तेव्हाच भगवंत त्याचे गुरु झाले आणि त्याला ज्ञान सांगायला सुरवात केली व आठरव्या अध्यायापर्यंत त्याला भक्ती,कर्म, ज्ञान अशा तिन्ही प्रकारे ज्ञान सांगून त्याला मुक्त केले. ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की सदगुरुवाचोनि संसारी तारक । नसेची निष्टांक आन कोणी ।।१।। इंद्र चंद्र देव ब्रह्मांदी करोनि । संशयाची श्रेणी छेदिती ना ।।२।। तात्पर्य सद्गुरुंचे श्रेष्ठत्व अबाधित आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय उध्दार होऊ शकत नाही . 
संत निळोबाराय यांना जगदगुरू श्री. तुकाराम महाराजांचा ध्यास लागला आणि अनुग्रह घ्यायचा तर तुकाराम महाराजांचाच. इतर कोणाचा नाही असे त्यांच्या मानाने निश्चित केले आणि संत निळोबारायांनी अनुष्ठान मांडले. हे अनुष्ठान मांडले तेव्हा तुकोबाराय वैकुंठाला गेलेले होते. या घटनेला जवळ जवळ २० वर्षे झालेले होते. पण सदगुरुंवर एकनिष्ठ भाव आणि श्रध्दा होती त्यांचे अनुष्ठान ४० दिवस चालले होते. त्यांचे अनुष्ठान पाहून साक्षात पांडुरंगाला करुणा उत्पन्न झाली आणि पांडुरंग श्री. निळोबारायांपुढे प्रगट झाले व त्यांना हाक मारली. निळोबा डोळे उघड. मी आलो आहे.  निळोबारायांनी विचारले आपण कोण आला अहात?  अरे ! निळोबा मी साक्षात पंढरीचा पांडुरंग आलो आहे. तुला दर्शन देण्यासाठी. तुझे अनुष्ठान पाहून मी प्रसन्न झालो आहे. सदगुरुंवरची निष्ठा बघा किती प्रगाढ होती. निळोबारायांनी  प्रत्यक्ष पांडुरंगाला उत्तर दिले, देवा ! मी तुमची प्रार्थना केली नाही किंवा तुम्हाला बोलवले नाही. तरीही तुम्ही कशाकरिता आलात? हे देवा ! जेव्हा प्रल्हादाला संकट पडले तेव्हा त्याने तुम्हाला प्रार्थिले. तेव्हा त्याच्याकरिता तुम्ही निर्जीव खांबातून प्रकट झालात. कारण प्रल्हादाला संकट तसेच होते. मला तर तसे काहीही संकट नाही तरीही तुम्ही का आलात ? देवा! आम्ही तुम्हाला ओळखीत नाही. श्री तुकाराम महाराजांचा धावा करतोय. देवा! मला तुमचीच प्राप्ती करून घ्यायची आहे. पण ! मला हे माझ्या सदगुरुंकडून व्हावे म्हणजे ते प्रमाण होईल. अन्यथा त्याचा काहीही उपयोग नाही. संत निळोबाराय म्हणतात , 
येथे तुजलागीं बोलाविले कोणी । प्रार्थिल्यावाचोनि आलासी का ।।१।।
प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडाया । स्तंभी देवराया प्रगटोनि ।।२।। 
तैशापरी मजला नाही बा संकट । तरी का फुकट श्रम केला ।।३।। 
निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा । तुकयाचा धावा करीतसे ।।४।। 
यावरून आपल्या लक्षात येते की खरोखर जीवनात सदगुरुंचे स्थान किती अनन्यसाधारण आहे. गुरुपरंपरा किती थोर आहे. अर्थात गुरुही त्या योग्यतेचे असावे लागतात. त्यांचीही काही लक्षणे आहेत. अशा लक्षणाने युक्त असलेले गुरूच शिष्याचा उद्धार करू शकतात. आपल्या देशात अशा श्रेष्ठ पद्धतीची गुरुपरंपरा आहे. गुरुकुल पूर्वी अस्तित्वात होते आजही काही ठिकाणी अशा परंपरा आहेत. पण क्वचितच. 
-भागवताचार्य अशोकानंद महाराज कडीर्ले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पाटील) ता. नगर 
मोबा. ९४२२२२०६०३ 

 

 

Web Title: How to get a request?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.