मोहाच्या क्षणी स्वत:ला कसं सांभाळाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:07 AM2019-09-27T04:07:35+5:302019-09-27T04:07:45+5:30

आकर्षणाच्या मोहापासून जे स्वत:ला सांभाळून घेतात ते सहसा त्या जाळ्यात अडकत नाहीत.

how to handle fascination situation | मोहाच्या क्षणी स्वत:ला कसं सांभाळाल?

मोहाच्या क्षणी स्वत:ला कसं सांभाळाल?

Next

- विजयराज बोधनकर

हा एक मोठा प्रश्न आहे की, जगायचं कसं? सांभाळून की भाळून... या तंत्रयुगात मोहात पाडणारे, आकर्षित करणारे क्षण आयुष्यात रोज नव्याने येतात आणि त्यावर भाळून जाण्याचेही प्रसंग येतात, यात जे भाळले जातात ते अनाठायी गुंततच जातात आणि शेवटास शून्य त्यांच्या हाती लागतं. याउलट आकर्षणाच्या मोहापासून जे स्वत:ला सांभाळून घेतात ते सहसा त्या जाळ्यात अडकत नाहीत. विश्वामित्र मेनकेवर भाळला आणि तपाचं सामर्थ्य घालवून बसला. मेनका हे आकर्षण आणि मोहाचं प्रतीक आहे.

आज मोहवणारी अनेक माध्यमं आपल्या डोक्यावर क्षणाक्षणाला आदळत राहतात. टीव्हीवरील भुलवणाऱ्या जाहिराती, भडक मालिका, अस्वस्थ करणाऱ्या बातम्या, वासना उद्दीपित करणारे सिनेमे व वेबमालिका, वृत्तपत्रातल्या चकवणाऱ्या अनेक जाहिराती, व्हॉट्सअ‍ॅपचा विळखा, फेसबुकवरचे अनेक अस्वस्थ करणारे व्हिडीओ अशा अनेक गोष्टी आज विळखा घालून बसल्यात. याही पलीकडे ग्राहकराजाला पूर्णपणे जायबंदी करण्याची अनेक षड्यंत्रं रोज नव्याने रचली जातात आणि यावर हळवी आणि अज्ञानी माणसं भाळतात. परंतु ज्याला आपली गरज आणि वस्तुस्थितीची नेमकी माहिती असते तो स्वत:ला सांभाळून घेतो, या खोट्या पिंजऱ्यात अडकत नाही. अशी माणसं खरोखरच दूरदृष्टीची असतात, याचं कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले पक्के संस्कार.

उत्तम जगण्यासाठी ज्या माणसाकडे अढळ सशक्त विचार करण्याची क्षमता असते तो कुठल्याही लोंढ्यात वाहून जाऊच शकत नाही. खोट्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत राहण्यासाठी आणि मृगजळावर मात करण्यासाठीच संतश्रेष्ठ श्री तुकाराम, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज अशांच्या मार्मिक साहित्याचं एक जरी पान रोज वाचलं तरी आपल्या शाश्वत अस्तित्वाला कुणीही ओढून नेऊ शकत नाही. भाळण्यावरचं हेच एकमेव औषध आहे. या संत मंडळीचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत.

Web Title: how to handle fascination situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.