अहम्... अहंकार... अविचार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 09:05 PM2018-10-06T21:05:33+5:302018-10-06T21:06:18+5:30

मी माझा स्वाभिमान जपतो. मला अहंकार जडला नाही, असे सांगणारा अभिमानी मनुष्य कधी अहंकारात विलिन होतो, हे त्यालाही कळत नाही.

how to keep yourself away from ego | अहम्... अहंकार... अविचार...

अहम्... अहंकार... अविचार...

googlenewsNext

- धर्मराज हल्लाळे

मी माझा स्वाभिमान जपतो. मला अहंकार जडला नाही, असे सांगणारा अभिमानी मनुष्य कधी अहंकारात विलिन होतो, हे त्यालाही कळत नाही. अन् हाच अहम अहंकार... अविचार... दु:खाचे मूळ बनतो.

अहंकाराच्या वेलीने गुरफटलेले झाड जसे स्वत:चे अस्तित्व हरवून बसते, तसे त्या माणसाचा चेहरा अहंकाररूपी वेलीत दिसेनासा होतो. जो दिसतो तो मीपणा. मुळात जे जवळ नसते ते दाखविण्याचा प्रयत्न होतो. ईर्ष्या निर्माण होते. द्वेष उत्पन्न होतो. सोबतची माणसे, जी वर्षानुवर्षे आपल्या अवतीभोवती ज्या उंचीवर असतात, त्यापेक्षा अहंकारी व्यक्ती स्वत:ला काल्पनिक उंचीवर घेऊन जाते. इतरांकडे तुच्छतेने बघण्याची दृष्टी जीवनात अंधार निर्माण करते. एका आभासी जीवनात आपला प्रवेश होतो. जे आपल्याजवळ नाही ते असल्याचा आविर्भाव अंगी येतो. मीपणातून संकुचितपणा उदयाला येतो. मी कसा वेगळा, माझेच काम कसे सरस, मी केले ते सर्वार्थाने योग्य, इतरांना ते जमणारच नाही, मी बोलतो ते खरे, मला जे समजते तेच सत्य, मी सांगतो ते इतरांनी ऐकावे, अहंकार अशा सर्व समजुती निर्माण करतो. इतरांचेही आपण ऐकावे, त्यांनाही आपण समजून घ्यावे, ही भूमिका परिणामी केव्हाच नष्ट होते. अहंकारातून अविचाराकडे वाटचाल सुरू होते. एकाधिकारशाही जन्माला येते. जिच्यामुळे व्यक्तीच्या सभोवतालचा परिघ कष्टी होतो. अहंकारी व्यक्तीचा सहवास नकोसा होतो. मने दुभंगतात. माणसे दूर जातात. शेवटी अहंकारी माणसाला एकांतवासाची शिक्षा होते.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजातील चांगल्या-वाईट वृत्ती, प्रवृत्तींचा स्पर्श प्रत्येकाला होत असतो. त्यातून चांगले ते स्वीकारून पुढे जाणारा माणूस लोकसंग्रह निर्माण करतो. तो जे बोलतो तसे वागतो. तो समोरील व्यक्तीच्या मताशी सहमत नसला, तरी त्याला त्याचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देतो. किंबहुना त्याच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतो. त्याच्याकडे असलेली विद्या त्याच्यातील विनम्रतेमुळे शोभून दिसते. त्याचे ज्ञान अहंकाराचा विनाश करणारे असते. दुसऱ्याच्या अज्ञानाला तो दूषणे देत नाही. तो स्वाभिमानी असतो. तिथेच अगदी समोर अहंकाराची रेषा असते. त्याच ठिकाणाहून अभिमान स्वाभिमानाचा प्रवास अहंकारच्या दिशेने होऊ शकतो. माणूस चांगला आहे, ज्ञानी आहे, विचारवंत आहे, संतवृत्तीचा आहे. परंतु त्याच्या ज्ञानाने आणि वर्तनाने अहंकाराच्या रेषेला स्पर्श केला आहे, हे जेव्हा बोलले जाते, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वात दोष उत्पन्न होतात. हे ज्याला समजते आणि उमजते तो सर्वगुणसंपन्न होऊन लोकमान्यता मिळवितो. अशी उंची गाठणे माझ्या आवाक्याचे नाही, असे न मानता प्रत्येकाने सदैव स्वत:ला दुरूस्त करीत राहिले पाहिजे. अहम् अहंकाराच्या रेषेला स्पर्श झाल्याचे जाणवले की जो क्षणार्धात दोन पाऊले मागे येतो तो आपली मान्यता टिकवितो. अन्यथा भल्याभल्यांच्या वाट्याला ज्ञानी होऊनही दूषणे आली आहेत.

Web Title: how to keep yourself away from ego

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.