भजन
By admin | Published: September 10, 2016 12:39 PM2016-09-10T12:39:16+5:302016-09-10T12:46:02+5:30
जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही
डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा
‘‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ।।’’
जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही. कारण ईश्वराने हा उत्कृष्ट असा मानव देह भजनासाठीच दिलेला आहे. ‘देवे दिला देह भजना गोमटा ।।’ मानवालादेवाने सर्वोकृष्ट अशी वाणी दिलेली आहे. मानवाची वाणी विचार प्रधान तर आहेच त्याबरोबर या वाणीने भावही प्रगट करता येतो. भगवंताला जोडण्याचे सहज साधन हे वाणीच आहे. ‘‘पवित्र तो देह वाणी पुष्यवंत । जो वदे अच्च्युत सर्वकाळ ।।’’ ‘‘भावे गावे गीत । शुध्द करुनिया चित्त ।। तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ।।’’ ईवरप्राप्तीचे सुलभ साधन असेल तर ते भजनच आहे. वारकरी संप्रदायाचे सर्वच वाड्मय गेय स्वरुपात निर्माण केलेले आहे. गायनामध्ये मनुष्य सहज रंगला जातो, रममाण होतो आणि त्याचे चित्त भगवंताशी एकाग्र होते. म्हणूनच सर्व संतांच्या रचना काव्य स्वरुपात आहेत आणि त्या गेय आहेत. संत तुकोबाराय म्हणतात ‘‘ गायनाचे रंगी । शक्ति अभ्दूत हे अंगी ।।’’ गायनामध्ये अभ्द्त शक्ती आहे याचाच अर्थ गायनाद्वारे सहज भगभ्दाव प्रकट होतो तसेच गेय वाड्मय पाठांतरासाठी सुलभ बनते. संत वाड्मय हे मंत्रग्रंथ आहेत, म्हणून त्याचे पारायण व पाठांतर आवश्यक आहे. काव्याचे पारायणही सोपे जाते आणि या भजनाद्वारे हरिनाम साधना घडते. कुठल्याही ग्रंथाचे पारायण करणे किंवा साग्रसंगीत भजन करणे हे नामचिंतनच आहे. कारण सर्व ग्रंथ अंतिमरित्या आपणास त्या परमेश्वराच्या नामालाच जोडू इच्छितात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘‘देखैं मनुष्य जात सकळ । हे स्वभावता भजनशील । पार्था जालेचि असे केवळ । माझा ठाई ।।’’ यामध्ये मानवाला त्याच्या मूळ स्वभावाची आठवण करुन दिली आहे आणि सूचित केले आहे की, मानवी जीवनाची मांडणी भगवभ्दजनावरच आहे.