म्हणे मी झुंझार कैसा झुंजो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:21 PM2019-03-02T12:21:52+5:302019-03-02T12:23:57+5:30

मनुष्याच्या अंगी अनेक प्रकारच्या शक्ती असतात. पण त्याला त्याची जाणीव नसते व एखादे साध्य प्राप्त करून घेण्याची क्षमता जरी असली तरी त्यला त्याचा आत्मविश्वास नसतो.

I would say, how to fight for a long time | म्हणे मी झुंझार कैसा झुंजो

म्हणे मी झुंझार कैसा झुंजो

Next

मेलबोर्न (आॅस्ट्रेलिया) : मनुष्याच्या अंगी अनेक प्रकारच्या शक्ती असतात. पण त्याला त्याची जाणीव नसते व एखादे साध्य प्राप्त करून घेण्याची क्षमता जरी असली तरी त्यला त्याचा आत्मविश्वास नसतो. मला हे जमणारच नाही, माझी योग्यताच नाही असे काहीतरी त्याला वाटत असते. वास्तविक पाहता आपल्या ठिकाणी जरी क्षमता नसेल आणि ध्येय साध्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर असली तर ते ध्येय प्राप्त होते. अनेक शास्त्रज्ञ असे होते कि ते शाळेत असतांना जेमतेम मार्क मिळवायचे पण पुढे त्यांच्या इच्छाशक्तीनेच त्यांनी महान शोध लावले. ‘निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ’ निश्चय जर दृढ असेल तर साध्य प्राप्त करणे काही अवघड नसते. प्रयत्नवादी माणसाला या जगात सर्व शक्य आहे.  `nothing is impossible in the world ` असे नेपोलियन आपल्या सैन्याना सांगून त्यांचे मनोधैर्य वाढवीत असे व जग्गजेता होण्याची महात्वाकांग्क्षा राखीत होता. याला वाटत होते कि तो जग जिंकील, भले त्याने जग जिंकले नसेल पण! त्यानेच जगातील अनेक देश पादाक्रांत केलेच होते. ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असे म्हणतात ते काही खोटे नव्हते. त्यांचा वसाहतवाद, शौर्य आणि इच्छाशक्ती याला मर्यादा नव्हती. म्हणूनच भौतिक जगात त्यांनी प्रगती केली. त्यांची शिकण्याची सुद्धा जिज्ञासा असायची. जेव्हा आपल्याकडे सर्वसामान्यांना वेद माहिती नव्हते तेव्हा ब्रिटिशांनी वेदाचे अनुवाद इंग्रजीत केले होते. प्रो. म्याक्समुलरने वेदाभ्यास करून त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. इंग्रजीत भाषांतर केले. मोगलांच्या काळात दारा शिकोह(औरंगझेबचा भाऊ) याने उपनिषदांचा अनुवाद अरबी, फारशी भाषेत केला होता. सफीनात अल औलिया आणि सकीनात अल औलिया हि सुफी संतचरित्रे,  ५२ उपनिषदाचा अनुवाद ‘सीर-ए-अकबर (सर्वात मोठे रहस्य) मध्ये केला होता. तात्पर्य दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही.
जगद्गृरू श्री तुकाराम महाराज तर धाडसाने म्हणत होते कि ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ येरांनी वाहवा भर माथा’ वास्तविक पाहता प्रस्थापित वर्गाकडून त्यांना विरोध होता. तरीही त्यांनी या विरोधाला जुमानले नाही आणि वेदाचा अर्थ खरेच सांगितला ते म्हणतात, ‘वेद अनंत बोलीला’ अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. इतका सोपा अर्थ मला नाही वाटत कोणी सांगितला असेल. म्हणून भौतिक असो अध्यात्मिक असो कोणत्याही क्षेत्रात मनुष्याच्या अंगी निष्ठा, प्रयत्न, दुर्दम्य इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी फार छान अभंग सांगितला आहे ते म्हणतात,
ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ?
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण

एक योद्धा स्वत:ला मोठा पराक्रमी समजतो आहे, पण वेळ आल्यावर मात्र घाबरतो आणि काही तरी कारणे सांगून माघार घेतो किंवा पळून जातो. त्याच्या शूरत्वाच्या नुसत्या वल्गना असतात. ‘कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला. उत्तर म्हणे, ‘असें जरि मीं एकाकी लहान, परि सवते’

यश जोडितों चि असता सारथि तरि, कथन मज न परिसवतें १
होता परम निपुण, परी त्या ख्यात रणांत सारथि गळाला,
झांको छिद्र भलतसा; अडले म्हणतात 'सार' थिगळाला २

पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हाचा प्रसंग, विराटाचा मुलगा उत्तर हा पराक्रमाच्या खूप गप्पा मारीत होता आणि जेव्हा दुर्योधन आपल्या सैन्यानीशी त्यांच्यावर चाल करून आला. तेव्हा हा म्हणाला, कि मला जर सारथी चांगला असता तर मी शत्रूला सहज हरवला असता तेव्हा अर्जुन बृहन्नडेच्या वेशात असतो. तो सारथी होण्यास तयार होतो. तरीही उत्तर घाबरतो व त्याची त्रेधा उडते याचेच वर्णन वरील कवितेत सुंदर केले आहे.
विदुर नीती सांगते की, नेतृत्व करणा-या शासकाचे वर्तन आणि बोली स्वबळ समजून असावी आणि सर्वसमान असायला हवी. कथनी आणि करणी मध्ये विसंगती नसावी.  पराक्रमाच्या वल्गना करणा-या व्यक्तीला अचानक धैर्य गळून माघार घ्यावी लागते व नाईलाजाने काही तरी खोटे नाटे बहाणे सांगावे लागतात. पण अशा माणसाची नाचक्की मात्र होते. कोणतेही कार्य करायचे अगोदर दोनदा विचार केला पाहिजे कि आपल्याला हे कार्य पार पडता येईल कि नाही?
आपणास मनुष्य जन्म मिळालाय तो मुक्त होण्याकरिता व त्यासाठी सर्व साधने सुद्धा उपलब्ध आहेत विचार शक्ती आहे, पण अत्माविस्वास मात्र नाही तर काही उपयोग नाही. आणि अशा माणसाला बळेच काही सांगूनही फायदा नाही. त्यासाठी महाराजांनी दृष्टांत दिला एक शूरत्वाच्या बाता मारणारा झुंजार मनुष्य युद्धावर निघतो आणि ऐन वेळी अवसानघात करतो तो म्हणतो, ‘मी झुंजार आहे पण काय करू माझे हात ढाल आणि तलवार यामध्येच गुंतले आहेत हे मला ओझे आहे आता मी कसा झुंजू ? पोटावर तलवार अडकवण्यासाठी पट्टा आहे, हत्यारं आहेत, डोक्यावर जिरेटोप आहे. हे ओझं तर मरणाचं दुसरं कारण झालं आहे. यांनी मला घोड्यावर बसवले आहे आणि आता मी कसा काय पळू ? तो शूर उपायालाच अपाय समजू लागला आहे. ज्या गोष्टीने साध्य प्राप्त होते त्याच गोष्टी अपाय समजू लागला आणि समोर आलेले कार्य तो टाळू लागला तर तो यशस्वी होणार नाही हे निश्चित. महाराज म्हणतात अरे! हा तर स्वत: परब्रम्ह आहे. पण हा मूर्ख आहे याला हे कळत नाही कि जर हा संतांचे संगतीत गेला तरच याला याचे खरे स्वरूप कळेल. ते म्हणजे हा जीव नसून ब्रह्म आह, हा देह नसून देहाला जाणणारा आहे, त्याचा साक्षी आहे. व्यापक अशा ब्रह्माचे ज्ञान जर याला झाले तर याचा संकोच निघून जाईल व हाच जीव ब्रह्म होईल पण हा भ्रमाने स्वत:चा संकोच करून ध्येयापासून बाजूला झाला आहे म्हणून जीवाने अनुभवी संत, विचारवंत यांची संगती करून मार्गदर्शन घ्यावे म्हणजे खरे ध्येय साध्य होण्यास अडचण येणार नाही.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पाटील) ता. नगर
ह. मु. मेलबोर्न,आॅस्ट्रेलिया
मोबाईल क्रमांक +६१ ४२२५६२९९१

 

Web Title: I would say, how to fight for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.