परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:23 AM2019-03-23T06:23:26+5:302019-03-23T06:23:37+5:30

श्रद्धेने भगवंतमय होणे, मनात सदैव भगवंताचेच मनन-चिंतन घुमत राहणे, भगवंत विचारातच तल्लीन होऊन जाणे हीच परमभक्तीची खूण आहे. भगवंतांचे अशा परमभक्तावर विलक्षण प्रेम असते. कारण असा परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो.

If the devotee is not of Bhogavatva, he is a true Yogi Purush | परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो

परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो

googlenewsNext

- वामनराव देशपांडे'

श्रद्धेने भगवंतमय होणे, मनात सदैव भगवंताचेच मनन-चिंतन घुमत राहणे, भगवंत विचारातच तल्लीन होऊन जाणे हीच परमभक्तीची खूण आहे. भगवंतांचे अशा परमभक्तावर विलक्षण प्रेम असते. कारण असा परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो. जे निष्कामभावाने प्रत्येक कर्म, फक्त भगवंतांचे नाम घेत पूर्ण करतात आणि ते कर्म फलासहित भगवंतालाच अर्पण करतात ते निष्काम कर्मयोगी भगवंतांना अत्यंत प्रिय असतात. असे योगीपुरुष शरीरभोगापासून पूर्णपणे अलिप्त असतात. असा श्रेष्ठ योगीपुरुष कुठल्याही प्रकारचा भोग आणि कुठल्याही स्वरूपाचा संग्रह यांना इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणे अजिबात महत्त्व देत नाहीत. किंबहुना हा योगीपुरुष भोग आणि संग्रह यांची उपेक्षाच करतो. परमात्म्याकडेच अवघे चित्त केंद्रित झाल्यामुळे भोगवृत्ती, संग्रहवृत्ती, मान, प्रतिष्ठा या इच्छा पूर्णपणे नष्ट झालेला हा योगी जो असतो, त्याची पूर्वजन्मातली पापेसुद्धा भस्म होऊन जातात. म्हणून असा योगी सर्वश्रेष्ठ असतो. भगवंत अर्जुनाला म्हणतात, ‘‘पार्था, तपस्यांपेक्षा अथवा ज्ञानी पुरुषांहूनही, तसेच सकामवृत्तीने कर्म करणाऱ्यांहूनही हा माझा श्रेष्ठ परमभक्त असलेला योगी श्रेष्ठ असतो, असे माझे मत आहे. पार्था, तू असा श्रेष्ठ योगी पुरुष हो.’’ परमभक्तीचे रहस्य उलगडून सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणाले, मयासक्तमना: पार्थ योगं युजन्मदाश्रय:।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु।।गीता : ७:१।।
‘पार्था, ज्या परमभक्तीचे स्थिर मन फक्त माझ्यातच गुंतलेले आहे, जो परमभक्त सतत माझेच नाम घेत माझ्यातच आसक्त झालेला आहे, अशा माझ्या परमप्रिय भक्ताला माझी वेगळी आठवण काढावी लागत नाही. सावली जशी आपल्या देहाबरोबरच असते ना, तसा माझा परमभक्त माझ्या सावलीसारखा माझ्याबरोबरच असतो. तो भक्त माझ्याच सोबत राहतो. त्याला खात्री असते की, माझा आश्रय एकदा का लाभला की, मानवी आयुष्य लाभलेला तो परमभक्त कुठल्याही स्वरूपातल्या चिंता अथवा काळजीचे काळेभोर ढग त्याच्या जगत असलेल्या आयुष्यावर ओथंबून येत नाहीत. माझ्या शाश्वत अस्तित्वाशी तो सहजपणे जोडला जातो. पार्था, तू माझा तसा परमभक्त हो आणि माझ्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाला समग्रपणे जाणून घे. तू एक कायम लक्षात ठेव की, ज्या परमभक्ताचे मन माझ्यात पूर्णांशाने आसक्त झालेले आहे, जो माझाच आश्रित झालेला आहे, तो योगीपुरुष, परमात्म्याशी क्षणभर का होईना, असा वियोग होईल असे देहाशी निगडित असलेले. ‘मी संबंधीचे कर्म करीतच नाही रे, पार्था. म्हणून तू तुझे मन, चित्त, बुद्धी, तुझी सर्व इंद्रिये माझ्यातच आसक्त कर.’’ शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी साधकापाशी अतुट श्रद्धा हवी की, या मायेने ओथंबलेल्या मर्त्य भ्रममूलक दृश्य विश्वात परमेश्वरी तत्त्व फक्त सत्य आहे. हे सत्य एकदा का जाणिवेच्या पातळीवर आपल्या अंत:करणात स्थिर झाले की खऱ्या अर्थाने आपल्या मोक्षप्राप्तीच्या साधनेला सुरुवात होते. भगवंत अर्जुनाला सांगतात,
न हि ज्ञानेन सद्दशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ।।
पार्था, या मानवी विश्वात, ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून अथक साधना करून फक्त परमेश्वरी अस्तित्व सत्यच आहे, याचे ज्ञान प्रथम करून घ्यावे, तरच करीत असलेली साधना फलद्रूप होते.

Web Title: If the devotee is not of Bhogavatva, he is a true Yogi Purush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.