क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 07:35 PM2019-10-26T19:35:16+5:302019-10-26T19:36:38+5:30

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते.

If there is anger, then he is not self-aware | क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे

क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे

Next

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड ) 

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते. आज बहुतांशी लोकांना या विकाराने ग्रासले आहे. याच क्रोधामुळे जीवनात अनेक अनर्थ घडतात. पण प्रश्न असा पडतो की हा क्रोध का बरं निर्माण होतो. .? शांतीसागर एकनाथ महाराज याचे कारण सांगतात; 
जेथे कामाचे अपूर्ण काज ! तेथे क्रोधाचे खवळे तेज!
काम भोगात व्यत्यय आला की क्रोध उत्पन्न होतो. एका विधवा मातेला चार वर्षाचा मुलगा होता. तिचे एका पुरूषावर प्रेम बसले. तो तिला इतका आवडला की; त्याच्या शिवाय ती राहूच शकत नव्हती. पण तो पुरूष मात्र तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. कारण तिला असणारा मुलगा त्याला मान्य नव्हता. त्या बाईला काम विकाराने पुरते ग्रासले होते. तिची अतृप्त इच्छा पूर्ण होण्याकरिता तिने मुलाचा गळा दाबला व त्याला ठार केले. जन्मदात्या आईला क्रोध विकाराने राक्षसीण बनवले. सुभाषितकार वर्णन करतात; 
क्रोधमूलमनर्थानां क्रोध:संसार बंधनम् ! धर्म: क्षयकर: क्रोध: तस्मात् क्रोधं परित्यजेत !!
या एकाच विकारामुळे प्रपंचात अनेक अनर्थ निर्माण होतात. संत एकनाथ महाराज म्हणतात; 
क्रोधा ऐसा महान वैरी! जडला असता निज जिव्हारी! जो ज्ञानाची मानी थोरी ! तो संसारी अतिमूर्ख !!
जो स्वत:ला आत्मज्ञानी म्हणवून घेत असेल, आणि त्याच्याजवळ क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे. एखादा स्वत:ला संत म्हणून घेत असेल, आणि त्याला क्रोध येत असेल तर तो संत नाही. हे विकार निर्माण होण्याचे एकच कारण आहे, अज्ञानाने देह म्हणजेच सर्वस्व आहे असे समजणे व देहाच्या सुखाकरिता विषयोपभोगा खेरीज दुसरे साधनच नाही असे समजून विकार वश होणे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; 
देहचि आपणपे मानिती ! विषय ते भोग्य म्हणती! यया पर ते न स्मरती आणकि काही!!
म्हणूनच हे घातक विकार निर्माण होतात. त्या करिता देहाचे व देहासाठी लागणाऱ्या विषयांचे क्षणभंगुरत्व कळले पाहिजे. हा क्रोध निर्माण होऊच नये असे वाटत असेल तर एकनाथ महाराज रामबाण उपाय सांगतात;
वाचे म्हणता शिवनाम ! तया न बाधी क्रोध काम!!

(लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

Web Title: If there is anger, then he is not self-aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.